June 6, 2026

‘गोरख धंद्या’तून उभे राहिले साम्राज्य? हवालदाराबाबत शहरात कुजबुज वाढली

IMG_20260606_200226

बारामती : एका हवालदाराची चर्चा सुरू असताना दुसरा चर्चेत; तीन जिल्ह्यांत कथित वसुलीचे जाळे, अवैध धंद्यांशी संबंधांच्या चर्चांना उधाण बारामती शहरात कथित बेकायदा वैभव आणि वसुलीच्या चर्चांचा विषय अद्यापही चर्चेत असतानाच आता आणखी एका हवालदाराच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मागील दोन दशकांहून अधिक काळ एका ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या या हवालदाराने पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत कथितपणे आपले जाळे विस्तारल्याची चर्चा चौकाचौकांत रंगू लागली आहे. त्यामुळे या हवालदाराच्या आर्थिक व्यवहारांबाबत आणि मालमत्तांबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या चर्चेनुसार, संबंधित हवालदाराने आपल्या दीर्घ सेवाकाळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक साम्राज्य उभे केले असल्याचे बोलले जात आहे. बारामती परिसरात गोडाऊन, आलिशान बंगला तसेच विविध भागांत केलेल्या मालमत्ता खरेदीमुळे त्याच्या संपत्तीचा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. नुकतीच दहा गुंठे जागा खरेदी केल्याची माहिती समोर आल्यानंतर या चर्चांना आणखी वेग आला आहे. सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या व्यक्तीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर मालमत्ता कशी जमा झाली, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शहरात सुरू असलेल्या चर्चांनुसार, पुणे, सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्यांतील विविध व्यवहारांमधून कथित वसुलीचे जाळे चालवले जात असल्याचा आरोप केला जात आहे. एवढेच नव्हे तर दहा ते बारा हायवा वाहनांशी संबंधित आर्थिक व्यवहारांमध्येही त्याचा सहभाग असल्याची चर्चा रंगत आहे. या सर्व चर्चांमुळे संबंधित हवालदाराच्या उत्पन्नाचे स्रोत आणि त्याच्या संपत्तीचा आलेख याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे, बारामती परिसरात सुरू असलेल्या विविध अवैध धंद्यांमागे अशा कथित वसुली व्यवस्थेचा हात असल्याचेही अनेकांकडून बोलले जात आहे. शहरात अनेक वर्षांपासून गुटखा, मटका, अवैध वाहतूक आणि इतर बेकायदा व्यवसायांविरोधात कारवाई होत असली तरी हे धंदे पूर्णपणे बंद का होत नाहीत, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही नागरिकांच्या मते, अवैध मार्गाने मिळालेला पैसा पुन्हा अशाच धंद्यांमध्ये गुंतवला जात असल्याने हे जाळे अधिक मजबूत होत आहे. त्यामुळे अशा कथित आर्थिक साखळ्यांची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणीही पुढे येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील चहाच्या टपऱ्यांपासून ते चौकाचौकांपर्यंत या कथित ‘वसुली साम्राज्या’ची चर्चा रंगत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मालमत्ता आणि आर्थिक व्यवहार उभे राहत असताना संबंधित यंत्रणांनी याकडे दुर्लक्ष का केले, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. काही जण तर या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखा किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत व्हावी, अशी मागणी करत आहेत.

दरम्यान, या कथित प्रकरणातील अनेक बाबी आणि व्यवहारांची माहिती टप्प्याटप्प्याने समोर येत असल्याचे बोलले जात आहे. वसुलीच्या नावाखाली सुरू असल्याचा आरोप असलेल्या या ‘गोरख धंद्या’ची सविस्तर माहिती लवकरच चव्हाट्यावर येणार असल्याची चर्चा शहरात रंगली असून, पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या चर्चांमागील वास्तव काय आणि संबंधित यंत्रणा याबाबत कोणती भूमिका घेणार, याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!