June 7, 2026

माफीसोबत किशोर मासाळ यांचा राजकीय बॉम्ब; रोहित पवारांवर मासाळ यांचे गंभीर आरोप

IMG_20260607_185911

बारामती : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बारामती नगरपालिकेचे नगरसेवक किशोर मासाळ यांनी अखेर सार्वजनिक माफी मागितली आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करत समस्त बारामतीकर, अजितदादा पवार यांचे कुटुंबीय तसेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेची हात जोडून क्षमा मागितली.

“माझ्याकडून गेलेले वक्तव्य पूर्णपणे चुकीचे होते. त्याबद्दल मला मनस्वी खेद आणि पश्चाताप होत आहे. माझ्या शब्दांमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे मी सर्वांची मनापासून माफी मागतो,” असे मासाळ यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणावरून राजकीय वातावरण तापवले जात असल्याचा आरोपही केला. “बारामतीकरांच्या भावना स्वाभाविक आहेत. मात्र, माझ्या वक्तव्याच्या आडून काहीजण राजकीय हेतू साधण्याचा प्रयत्न करत आहेत. या विषयाचे अनावश्यक राजकारण केले जात आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

प्रायश्चित्त म्हणून अन्नत्याग

आपल्या चुकीबद्दल प्रायश्चित्त घेण्यासाठी ९ जून रोजी सकाळी पावणे नऊ वाजल्यापासून स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अपघातस्थळी एक दिवसाचे अन्नत्याग करून आत्मक्लेश करणार असल्याची माहिती मासाळ यांनी दिली. “आत्मक्लेशातून माझी चूक मान्य करण्याचा आणि समाजापुढे पश्चाताप व्यक्त करण्याचा हा प्रयत्न असेल,” असे ते म्हणाले.

संघटनात्मक पदांचा राजीनामा; नगरसेवक पद सोडण्यास नकार
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) सर्व संघटनात्मक पदांचा राजीनामा देणार असल्याचे मासाळ यांनी जाहीर केले. ७ जून रोजी संबंधित राजीनामे पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र, नगरसेवक पदाचा राजीनामा देण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. “माझी निवड बारामतीतील जनतेने केली आहे. नगरसेवक पदाचा निर्णय मतदारांचा आहे. त्यामुळे कोणाच्याही दबावाखाली मी नगरसेवक पदाचा राजीनामा देणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

उपमुख्यमंत्री ‘सुनेत्रा पवार यांच्या विजयापर्यंत कोणत्याही पक्षात प्रवेश नाही’

मासाळ यांनी आपल्या राजकीय भूमिकेबाबतही स्पष्ट भाष्य केले. “मी आज, काल आणि उद्याही अजितदादा पवार यांच्या कुटुंबाशी प्रामाणिक राहणार आहे. पक्षातील पदे सोडल्यानंतरही २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा गुलाल पडेपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही,” असे त्यांनी सांगितले.

स्थानिक पदाधिकाऱ्यांना अधिकार नसल्याचा दावा

आपल्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या पक्ष पदाधिकाऱ्यांवरही त्यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला. “स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही. मला अद्याप उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, युवा नेते जय पवार किंवा पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाकडून कोणताही आदेश मिळालेला नाही. त्यांच्याकडून आदेश आल्यास तो माझ्यासाठी अंतिम असेल,” असे मासाळ म्हणाले.

रोहित पवारांवर आरोप; दिले खुले आव्हान

पत्रकार परिषदेत बोलताना मासाळ यांनी आमदार रोहित पवार यांच्यावरही गंभीर आरोप केले. “माझ्या राजीनाम्याच्या मागणीमागे पडद्याआड राजकारण सुरू आहे. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय गणिते आखली जात आहेत. माझ्यावर टीका करणाऱ्या सोशल मीडिया मोहिमेमागे रोहित पवार यांच्या समर्थकांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे,” असा आरोप त्यांनी केला.

यासोबतच त्यांनी रोहित पवार यांना खुले आव्हान दिले. “रोहित पवार यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीस्थळी येऊन आपल्या कुटुंबातील कोणीही भविष्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांविरोधात विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असे प्रतिज्ञापत्र द्यावे. त्यांनी तसे केल्यास मी त्याच ठिकाणी नगरसेवक पदाचा राजीनामा देईन,” असे आव्हान त्यांनी दिले.

विनयभंग प्रकरणावर प्रतिक्रिया टाळली

आपल्याविरोधात दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. “हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्याचा तपास सुरू आहे. त्यामुळे त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. मात्र, या विषयाला काहीजण राजकीय आणि जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

बारामतीच्या राजकारणात नवे वळण

किशोर मासाळ यांच्या पत्रकार परिषदेमुळे बारामतीच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. सार्वजनिक माफी, संघटनात्मक पदांचा राजीनामा, नगरसेवक पद न सोडण्याची भूमिका, अन्नत्याग आंदोलनाची घोषणा तसेच रोहित पवार यांच्यावर केलेले आरोप यामुळे हे प्रकरण आणखी चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून आगामी काळात याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

You may have missed

error: Content is protected !!