बारामतीत १८ वर्षांपासून ठाण मांडलेल्या हवालदाराच्या वसुलीच्या फंड्याची चर्चा; बचत गटाच्या खात्याद्वारे पैशांची वसुली केल्याचा आरोप
बारामती : बारामती शहरात तब्बल १८ वर्षांपासून कार्यरत असलेल्या एका हवालदाराच्या कथित वसुली नेटवर्कची जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे. बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींकडून नियमितपणे आर्थिक व्यवहार करून घेण्यासाठी संबंधित हवालदाराने थेट एका बचत गटाचा वापर केल्याची माहिती समोर येत असल्याने खळबळ उडाली आहे.
स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या चर्चेनुसार, विविध अवैध धंद्यांशी संबंधित व्यक्तींकडून थेट रोख स्वरूपात पैसे घेण्याऐवजी आर्थिक व्यवहार लपविण्यासाठी एका बचत गटाच्या खात्याचा वापर करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. यासाठी कथितरीत्या “राष्ट्रीय कृत पुरुष बचत गट” नावाची संस्था स्थापन करण्यात आल्याची माहिती काही सूत्रांकडून मिळत आहे.
या बचत गटाच्या खात्यावर विविध व्यक्तींकडून नियमित स्वरूपात रक्कम जमा होत असल्याची चर्चा असून, त्या व्यवहारांचा आणि संबंधित हवालदाराच्या संपर्कातील व्यक्तींचा तपास झाल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात, असा दावा नागरिकांकडून केला जात आहे.
विशेष म्हणजे, बारामतीत दीर्घकाळापासून कार्यरत असलेल्या या हवालदाराच्या आर्थिक व्यवहारांबाबत यापूर्वीही विविध पातळ्यांवर चर्चा झाली होती. मात्र आता बचत गटाच्या माध्यमातून व्यवहार केल्याच्या आरोपांमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याशी संबंधित आर्थिक व्यवहार, त्याच्या संपर्कातील संस्था, बचत गट तसेच खात्यांमधील पैशांची आवक-जावक याची सखोल चौकशी झाल्यास वास्तव समोर येऊ शकते. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या चर्चेची गंभीर दखल घेऊन आवश्यक पडताळणी करावी, अशी मागणी होत आहे.
