बारामतीत महागाईविरोधी बैलगाडी मोर्चा; आंदोलनावर आचारसंहितेच्या भंगाची टांगती तलवार
बारामती : वाढती महागाई, वीजपुरवठ्यातील अडचणी, कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न आणि शेतकरी समस्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामती शहरात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. मात्र, निवडणूक आचारसंहिता लागू असतानाच हे आंदोलन झाल्याने आता या मोर्च्याभोवती राजकीय आणि कायदेशीर वाद निर्माण झाला आहे.
मोर्चामध्ये युगेंद्र पवार स्वतः बैलगाडीत बसून सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसेच रस्त्यावर चूल पेटवून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असून जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींनी जनतेचे आर्थिक गणित कोलमडल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
आंदोलनादरम्यान शेतकरी प्रश्नांवरही आवाज उठवण्यात आला. कांदा उत्पादकांना हमीभाव मिळावा, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. वाढत्या इंधन दरांमुळे आणि महागाईमुळे नागरिक त्रस्त असल्याचे आंदोलकांचे म्हणणे होते.
यावेळी युगेंद्र पवार यांनी बारामती परिसरातील लोडशेडिंगच्या समस्येवरही जोरदार टीका केली. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असून चोरीच्या घटनांनाही खतपाणी मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत पोलीस प्रशासनावरही त्यांनी निशाणा साधला. मात्र, आंदोलन संपताच चर्चेचा केंद्रबिंदू महागाईऐवजी आचारसंहिता ठरली. निवडणूक आचारसंहिता लागू असताना मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची जमवाजमव करून मोर्चा काढल्याने नियमांचे उल्लंघन झाले नाही का?, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
यासंदर्भात बोलताना बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीशैल चीवडशेट्टी यांनी सांगितले की, आंदोलनाची माहिती पोलिसांनी घेतली असून निवेदन स्वीकारताना संबंधितांना आचारसंहितेची माहिती देण्यात आली होती. नियमांचे उल्लंघन झाल्याने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
महागाईच्या मुद्द्यावर सुरू झालेले हे आंदोलन आता आचारसंहितेच्या भंगाच्या वादात अडकले असून प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कारवाई होते की आंदोलनाला राजकीय रंग देण्यात येतो, यावरून पुढील काही दिवस बारामतीतील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.
