बारामतीच्या राजकीय रंगमंचावर ‘मनोरंजन महोत्सवा’ची रंगत वाढली!
बारामती : बारामतीकरांनी नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला भरभरून मतदान करून एकापेक्षा एक “भारी नग” निवडून दिल्याची चर्चा सध्या शहरात रंगली असून, त्यातून निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींमुळे नागरिकांची करमणूक मात्र भरपूर होत असल्याचे उपरोधिक बोलले जात आहे.
काही सत्ताधारी नगरसेवकांची रंगमंचावर उभा असलेल्या माकडा सारखी आवस्था झाली असल्याचे चौकाचौकात बोलले जात आहे. सत्ताधारी नगरसेवकच एकमेकांचे कपडे फाडण्यात व्यस्त असून, कुणाचे कथित खरात कनेक्शन समोर येत आहे, कुणावर महिलांशी गैरवर्तनाचे आरोप होत आहेत, तर कुणाच्या घरातील व्यक्तीच स्वतः नगरसेवक असल्याच्या थाटात वावरत असल्याची चर्चा रंगली आहे.
एकंदरीत बारामतीकरांच्या मनोरंजनात कोणतीही कमतरता राहू नये याची जणू काही काळजीच काही मंडळी घेत असल्याचे उपरोधिकपणे बोलले जात आहे. या सगळ्या राजकीय नाट्यावर करमणूक कर लावला गेला नाही, हेच बारामतीकरांचे नशीब असल्याचीही मिश्कील प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटताना दिसत आहे.
दरम्यान, भाजपचे ॲड. राम सूर्यवंशी यांनीही या परिस्थितीवर भाष्य करताना, “बारामतीच्या सुसंस्कृत प्रतिमेचा काही लोकांनी चिखल केला असला, तरी आम्ही आशा सोडलेली नाही. निसर्गाचा नियम आहे, अंधार कायम राहत नाही. वाईटातूनही काहीतरी चांगले घडते. त्यामुळे हा अंधारही लवकरच संपेल,” अशी अपेक्षा व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.
शहरात आणखी एक व्यंगात्मक चर्चा जोर धरत आहे. कुणी महिलांसोबत कथित प्रकरणांमुळे चर्चेत आहे, कुणी राजकारणासाठी लग्न न करता संन्यास घेतल्याची प्रतिमा उभी करत आहे, तर कुणी अवैध दारू, जुगार, मटका आणि इतर धंद्यांच्या जोरावर स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणून मिरवत असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, जे खरोखर समाजासाठी झटतात, जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवतात, सामाजिक काम करतात, ते कार्यकर्ते मात्र गाजावाजा न करता घरीच बसलेले दिसतात. तर दुसरीकडे प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्यांचीच राजकीय बाजारात चलती असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सध्या तरी बारामतीतील राजकीय रंगमंचावर विनोद, व्यंग, आरोप, प्रत्यारोप आणि चर्चांचा अखंड प्रयोग सुरू असून, या नाटकाचा पुढचा अंक कोणता असेल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. मात्र या सर्व घडामोडींनंतर एक प्रश्न मात्र कायम आहे — बारामतीकरांचे अभिनंदन करावे की सांत्वन?
