“भेट दिलेली थार… राजाळ्यावरून येणारी ‘नार’… बारामतीत हवालदाराच्या कथित मायाजालाची रंगली जोरदार चर्चा!”
बारामती : बारामती शहरात एका पोलीस हवालदाराच्या कथित अवैध वैभवाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता नवे वळण मिळाले असून, “भेट” म्हणून दिलेली महागडी थार गाडी आणि राजाळ्यावरून नियमित येणारी एक नार शहरभर चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या हवालदाराच्या कथित वसुली नेटवर्क, अवैध आर्थिक व्यवहार आणि प्रभावशाली संपर्कांबाबत धक्कादायक माहिती समोर येत असल्याने शहरातील राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सर्वाधिक चर्चा सध्या सुरू आहे ती संबंधित हवालदाराकडे असलेल्या महागड्या गाड्या, कोट्यावधी रूपयांचे राहते घर हे कोणत्या उत्पन्नातून आले आहे ? त्या बदल्यात कोणते व्यवहार झाले? आणि त्या व्यवहारांमागे कोणाचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत? याबाबत आता चौकाचौकात चर्चा रंगू लागली आहे. काही नागरिकांच्या मते, हे केवळ कथित वसुली आणि आर्थिक देवाणघेवाणीच्या साखळीतील एक भाग असू शकतो.
विशेष म्हणजे, या प्रकरणाशी संबंधित फोटो, व्हिडिओ आणि काही कथित पुरावे सामाजिक कार्यकर्ते व काही जागरूक नागरिकांकडे जमा होत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, “नियमित येणारी नार” ही चर्चा देखील शहरात प्रचंड गाजत आहे. संबंधित हवालदाराशी जोडून एका महिलेबाबत विविध पातळ्यांवर कुजबुज सुरू असून, तिच्या नियमित येण्या-जाण्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणामागे आर्थिक व्यवहार, प्रभावशाली व्यक्तींची जवळीक आणि कथित काळ्या पैशाचा प्रवाह असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
शहरातील अनेकांच्या मते, गेल्या काही वर्षांत संबंधित हवालदाराने अचानक उभे केलेले वैभव, महागडी जीवनशैली, वाढलेले संपर्क आणि कथित आर्थिक ताकद यामागे नेमके कोणते स्रोत आहेत, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. “एका सामान्य शासकीय कर्मचाऱ्याकडे एवढे वैभव कसे?” हा प्रश्न आता नागरिक उघडपणे विचारू लागले आहेत.
दरम्यान, शहरात सुरू असलेल्या चर्चांमुळे संबंधित विभागातील काही अधिकारीही सावध झाल्याची माहिती मिळत आहे. पुढील काळात या कथित मायाजालाचा आणखी मोठा भांडाफोड होणार का? याकडे आता संपूर्ण बारामतीचे लक्ष लागले आहे.
