खाकीच्या आडचं ‘वसुली नेटवर्क’?” बारामतीतील अवैध साम्राज्यावर मोठे प्रश्नचिन्ह; गुन्हेगारी जगतात खळबळ
बारामती : बारामती शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून एका पोलीस हवालदाराच्या कथित गैरकृत्यांवरून सुरू झालेल्या चर्चेने मोठे स्वरूप धारण केले असून, अवैध धंदे, गुन्हेगारी साखळी आणि कथित वसुली नेटवर्कबाबत धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. सलग प्रसिद्ध झालेल्या दोन धडक बातम्यांनंतर बारामतीतील अवैध धंदेवाल्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, पोलीस प्रशासनातील बेकायदा वैभव कमावलेल्या संशयित घटक आणि गुन्हेगारी जगतामधील कथित संबंधांवर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सर्वसामान्य नागरिक अन्यायाविरोधात न्याय मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे धाव घेतात. मात्र, त्याच व्यवस्थेतील काही व्यक्ती जर कथितरित्या अवैध धंदेवाल्यांना संरक्षण देत असतील, तर सामाजिक सुरक्षितता आणि न्यायव्यवस्थेवर किती गंभीर परिणाम होऊ शकतो, याचीच चर्चा आता बारामतीत रंगू लागली आहे.
शहरात दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चेनुसार, संबंधित हवालदार गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीतच कार्यरत असून, त्याच्या नावाभोवती कथित अवैध वसुली, धंदेवाल्यांशी संपर्क, गुन्हेगारी जगतातील हस्तक्षेप आणि आर्थिक व्यवहारांच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. काही माध्यमांमधून त्याच्या संपत्ती, कार्यपद्धती आणि कथित संबंधांवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर या चर्चांना अधिक वेग मिळाला आहे.
विशेष म्हणजे, बारामती शहर आणि ग्रामीण भागातील काही पोलीस ठाण्यांमध्ये “वसुली एजंट” म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींचे कथित नेटवर्क सक्रिय असल्याची माहिती आता पुढे येत असल्याची चर्चा आहे. अवैध धंदे, जुगार, मटका, वाळू, हातभट्टी, वाहतूक आणि इतर व्यवहारांमधून नियमित स्वरूपात आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचे आरोप नागरिकांकडून केले जात आहेत. या संपूर्ण साखळीमुळे अनेक अवैध धंद्यांना कथित संरक्षण मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
या बातम्यांनंतर अवैध धंदेवाल्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून, “कोणाची नावे बाहेर येणार?”, “कोणत्या व्यवहारांची चौकशी होणार?”, “कोणत्या अधिकाऱ्यांचे संबंध उघड होणार?” याबाबत शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. काही ठिकाणी तर संबंधितांनी स्वतःचे संपर्क आणि हालचाली कमी केल्याचीही चर्चा ऐकायला मिळत आहे.
दरम्यान, काही नागरिकांनी पुढे येत कथित वसुली, आर्थिक व्यवहार, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि इतर पुराव्यांची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ एका हवालदारापुरते मर्यादित न राहता, बारामतीतील अवैध साम्राज्य, त्याला मिळणारे कथित संरक्षण आणि गुन्हेगारी साखळीचा मोठा चेहरा समोर आणणारे ठरू शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शहर आणि ग्रामीण भागात सुरू असलेल्या काही अवैध धंद्यांबाबत वारंवार तक्रारी होत होत्या. मात्र, त्यांच्यावर ठोस कारवाई होत नसल्याने सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. आता या संपूर्ण प्रकरणामुळे “नेमके संरक्षण कोण देत होते?”, “कारवाई का टाळली जात होती?”, “कोणाच्या आशीर्वादाने अवैध साम्राज्य वाढत गेले?” असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते आणि जागरूक नागरिकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. “पोलीस दलातील प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रतिमा काही मोजक्या व्यक्तींमुळे मलीन होत आहे. त्यामुळे या प्रकरणात पारदर्शक चौकशी होणे आवश्यक आहे,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, या संपूर्ण घडामोडींमुळे पोलीस प्रशासनातही अंतर्गत खळबळ उडाली असून, अनेकजण आता सावध भूमिका घेत असल्याचे बोलले जात आहे. बारामतीतील गुन्हेगारी, कथित वसुली नेटवर्क आणि अवैध धंद्यांच्या मुळावर घाव घालणाऱ्या या प्रकरणातून पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
