स्थानिक पुढाऱ्यांच्या निष्क्रियतेचा फटका; बारामतीत मतदान घसरले,
बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी मतदानाची नोंद झाली असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत केवळ ५८.२७ टक्के मतदान झाले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेल्या या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह एकूण २३ उमेदवार रिंगणात असले तरी विरोधकांचा प्रभाव दिसून न आल्याने निवडणूक एकतर्फी झाल्याचे चित्र दिसून आले. आता त्यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा निकाल ४ मे रोजी लागणार आहे.
सकाळच्या सत्रात मतदानाची गती अत्यंत मंद होती. सकाळी ९ वाजेपर्यंत अवघे ८.१० टक्के मतदान झाले होते. त्यानंतर ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत ३१.९१ टक्के, तर दुपारी ३ वाजेपर्यंत ४०.३६ टक्के मतदानाची नोंद झाली. सायंकाळी उन्हाचा तडाखा कमी झाल्यानंतर काही प्रमाणात मतदार बाहेर पडले, मात्र अंतिम सहा वाजेपर्यंत टक्केवारी ५८.२७ वरच थांबली.
या निवडणुकीत विरोधी पक्षांकडून कोणताही दमदार उमेदवार नसल्याने अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर दुपारच्या वेळेत शुकशुकाट दिसून आला. अनेक उमेदवारांनी केवळ उमेदवारी ठेवली, पण प्रचारात सक्रिय सहभाग घेतलाच नसल्याचेही चित्र होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथे कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. मतदानापूर्वी त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत अभिवादन केले तसेच आशाताई पवार यांचे आशीर्वाद घेतले. खासदार सुप्रिया सुळे यांनीही कुटुंबासह मतदान करत मतदारांना मतदानाचे आवाहन केले. जय पवार, युगेंद्र पवार आदींनी दिवसभर विविध मतदान केंद्रांना भेटी देत परिस्थितीचा आढावा घेतला.
मात्र, कमी मतदानामागे केवळ उष्णता किंवा एकतर्फी लढत हेच कारण नसून स्थानिक पातळीवरील निष्क्रियता आणि नियोजनाचा अभावही ठळकपणे समोर आला. अनेक भागांत मतदारांपर्यंत मतदान केंद्रांची अचूक माहिती पोहोचली नाही. काही ठिकाणी बूथ बदलल्याची माहिती शेवटच्या क्षणी मिळाल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
याशिवाय, स्थानिक पुढाऱ्यांनी प्रचारात अपेक्षित सक्रियता दाखवली नसल्याची नाराजी कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली. कार्यकर्त्यांची दुखावलेली मने आणि त्यातून निर्माण झालेली उदासीनता याचा थेट परिणाम मतदानावर झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली.
आता सर्वांचे लक्ष ४ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले असून, सुनेत्रा पवार यांचे मताधिक्य किती विक्रमी ठरणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
