नाव दत्ताच आणि धंदा गुटख्याचा; बेकायदा साखळीचा भंडाफोड
बारामती : नाव धार्मिक भावनेशी जोडलेले असले तरी प्रत्यक्षात मात्र गुटख्याच्या बेकायदा धंद्याची मोठी साखळी उभारल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील वसंतनगर परिसरात वास्तव्यास असलेला हा गुटखा विक्रेता तांदुळवाडी येथे मोठ्या प्रमाणात गोडाऊन चालवत असल्याची माहिती पुढे आली आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीकडून “गुलाम” नावाच्या गुटख्याची महिन्याला लाखो रुपयांची बेकायदा विक्री होत असल्याचा आरोप आहे.
शहरातील विविध भागात त्याची साखळी पसरलेली असून, छोट्या विक्रेत्यांमार्फत हा गुटखा मोठ्या प्रमाणावर बाजारात पोहोचवला जात असल्याचे सांगितले जात आहे.
ही बाब उघडकीस आल्यानंतर अनेकांनी पुढे येऊन या गुटखा साखळीबाबत माहिती दिली आहे. संबंधित व्यक्तीचा प्रभाव आणि जाळे इतके मोठे आहे की, आतापर्यंत त्याच्यावर ठोस कारवाई का झाली नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, शहरातील वसंतनगर आणि तांदुळवाडी येथील गोडाऊनमधून मोठ्या प्रमाणात साठा ठेवून वितरण केले जात असल्याची चर्चा असून, हा संपूर्ण प्रकार आरोग्य आणि कायद्याच्या दृष्टीने गंभीर मानला जात आहे. आता या प्रकरणात पोलिस प्रशासन कारवाई करणार का? बेकायदा गुटखा विक्रीच्या या साखळीवर आळा बसणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
