June 8, 2026

“बारामतीकरांनी मतदान केलं नाही तर करंटे ठरू” – फडणवीसांचे आवाहन

IMG-20260421-WA0218

बारामती : “आज सांगता सभेला किंवा वहिनींच्या प्रचाराला आमच्यापैकी कोणीही आलं नसतं तरीही बारामतीकरांनी वहिनींना निवडून दिलं असतं. मात्र हा यज्ञ दादांच्या स्मृतीचा आहे आणि त्या यज्ञात आपलीही आहुती देण्यासाठी आम्ही आलो आहोत,” अशी भावनिक प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सांगता सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी बारामतीकरांना आवाहन करत, “आपण सर्वांनी या यज्ञात सहभागी झालं पाहिजे, अन्यथा आपण करंटे ठरू. त्यामुळे प्रत्येक बारामतीकराने मतदान करावं,” असं स्पष्ट केलं.

दिवंगत अजितदादा पवार यांच्या पश्चात वहिनींना विक्रमी मतांनी निवडून देण्याचं आव्हानही त्यांनी उपस्थित केलं. “हे कठीण शिवधनुष्य पेलायचं आहे. नेत्यांची क्षमता ओळखण्याची ताकद दादांमध्ये होती आणि ती क्षमता आता मलाही जाणवते. वहिनींच्या रूपाने बारामतीला सक्षम नेतृत्व मिळालं आहे,” असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.तसेच, अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत निष्पक्ष चौकशीची मागणी करत, “जोपर्यंत अपघाताचं खरं कारण स्पष्ट होत नाही, तोपर्यंत आम्हीही शांत बसणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

सभेत बोलताना फडणवीस यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करत, “महाराष्ट्राच्या विकासात त्यांचं योगदान मोठं आहे. त्यांनी ११ अर्थसंकल्प सादर करत राज्याच्या प्रगतीचा मार्ग आखला. आवश्यकतेनुसार कणखर आणि प्रसंगी संवेदनशील असा समतोल स्वभाव असलेलं नेतृत्व घडण्यासाठी अनेक वर्षांची वाट पाहावी लागते,” असं नमूद केलं.

“त्यांचं जाणं हे केवळ कुटुंबीय किंवा बारामतीपुरतं मर्यादित नुकसान नसून, संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठी हानी आहे,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

You may have missed

error: Content is protected !!