महिला कुस्तीगारांना मैदानात बंदी; आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामती : इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावच्या हद्दीत यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती मैदानात महिला कुस्तीगारांना जाणीवपूर्वक कुस्ती खेळण्यास नकार देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामुळे महिला खेळाडूंच्या अस्तित्व व सन्मानाचा प्रश्न निर्माण झाला असून संबंधित आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत महिला कुस्तीगारांच्या तीन ते चार कुस्त्या नियोजित होत्या. त्यासाठी महिला खेळाडू मैदानावर उपस्थित राहिल्या होत्या. मात्र, त्या महिला असल्याचे कारण देत आयोजकांनी त्यांना कुस्ती खेळण्यास नकार दिला. यावर महिला खेळाडू व फिर्यादी यांनी जाब विचारला असता, ट्रस्टचे अध्यक्ष व त्यांच्या सोबत असलेल्या तिघांनी जाणीवपूर्वक अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप आहे.
यावेळी संबंधितांकडून जातीवादी शिवीगाळ करण्यात आली तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. “तू कोण आहेस, येथून निघून जा, तुझा याच्याशी काही संबंध नाही,” अशा शब्दांत महिलांसह फिर्यादीचा अपमान करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच “महिलांचा एवढा पुळका असेल तर आपल्या घरी कुस्त्या लाव,” अशीही अवमानकारक भाषा वापरण्यात आली.
महिलांना समान हक्क असतानाही स्त्री-पुरुष भेदभाव करून कुस्ती खेळण्यास बंदी घालण्यात आल्याने हा प्रकार गंभीर मानण्यात येत आहे. या प्रकरणी नागरी हक्क संरक्षण अधिनियम तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत आणि इतर संबंधित कलमान्वये आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
