३५ गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार जेरबंद; तीन खुनांचे गुन्हे उघड
बारामती : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि खेड पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत ३५ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली असून, या कारवाईत पुणे ग्रामीण हद्दीतील दोन आणि ठाणे शहर आयुक्तालयातील एक असे एकूण तीन खुनांचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.
खेड पोलीस ठाण्यात दाखल खून प्रकरणाच्या तपासादरम्यान जैदवाडी (ता. खेड) येथे धनंजय मारुती घेवडे (वय ३३) यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या डोक्यावर व तोंडावर अज्ञात हत्याराने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी मयताच्या भावाने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
घटनास्थळ दुर्गम भागात असल्याने सीसीटीव्ही उपलब्ध नव्हते. मात्र मुख्य रस्त्यांवरील सुमारे ११० कॅमेऱ्यांचा मागोवा घेत सहा दिवसांच्या तपासानंतर ललित दीपक खोल्लम ( रा. शिरोली, ता. खेड ) आणि नंदलाल दिलीप होले ( रा. कारेगाव, ता. आंबेगाव ) हे संशयित म्हणून समोर आले. वडगाव निंबाळकर परिसरात सापळा रचून पोलिसांनी दोघांना शिताफीने ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपींनी धनंजय घेवडे यांचा लोखंडी रॉड व दगडाने मारून खून केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात निलेश कैलास सणस याने आर्थिक मदत केल्याचेही समोर आले असून त्यालाही अटक करण्यात आली आहे. ठाणे व खेड येथील आणखी दोन खुनांचा उलगडा सखोल चौकशीत आरोपी ललित खोल्लम याने प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून श्रीकांत वाडेकर (वय २६) याचे अपहरण करून खून केल्याचे कबूल केले. त्यानंतर मृतदेह जाळून पुरावे नष्ट केल्याचेही उघड झाले. या प्रकरणी ठाणे येथील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे. तसेच श्रीकांतची आई रूपाली वाडेकर हिचाही खून आरोपीने केल्याचे समोर आले. तिला शिरोली येथे बोलावून लोखंडी रॉड व चाकूने वार करून ठार मारण्यात आले होते.
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी गंभीर
मुख्य आरोपी ललित खोल्लम याच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे एकूण ३५ गुन्हे दाखल आहेत. तो मोक्का अंतर्गत कारवाई होऊन सध्या जामिनावर बाहेर होता. नंदलाल होले याच्यावरही दरोड्याचा गुन्हा आहे. तपासादरम्यान आरोपींकडून खुनासाठी वापरलेले लोखंडी रॉड, पुरावे नष्ट करण्यासाठी जाळलेले कपड्यांची राख, तसेच मयताचा मोबाईल जप्त करण्यात आला. याशिवाय आरोपीने मध्यप्रदेशातून आणलेली दोन गावठी पिस्तुले व चार काडतुसेही पोलिसांनी हस्तगत केली आहेत.
पोलीस कोठडी मंजूर
तीन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता १३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण, साहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, कुलदीप संकपाळ, नागनाथ पाटील, अभिजीत सावंत, पोलीस अंमलदार दिपक साबळे, संदिप वारे, विक्रम तापकीर, हेमंत विरोळे, निलेश सुपेकर, अक्षय नवले, राजू मोमीण, अतुल डेरे, श्रेणी पोसई बाळासाहेब कारंडे, विनोद भोकरे, मंगेश थिगळे, भाऊसाहेब पुंड, अजय देडे, बाळासाहेब खडके, सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, निलेश शिंदे, अजय घुले, राहूल पवार, रणजित कोंडके, खेड पोलिस ठाण्याचे श्रीकांत गोडगे, महेश गरड, शंकर भवारी, अंमलदार जिजाबापू बिडकर, सुदर्शन माताडे, महेश गोसावी, स्वप्निल लोहार, गोकुळ कोळी, संकेत कवडे, प्रविण आढारी, ऋषीकेश गोपतवाड, पोलीस कर्मचारी वैशाली कांबळे, वडगाव निंबाळकर अंमलदार पोपट नाळे, हृदयनाथ देवकर यांनी केली असून पुढील तपास खेड पोलीस स्टेशन करते आहे.
