May 26, 2026

बारामतीत चोरीच्या घटना उघड; अल्पवयीनांसह भंगार व्यावसायिकाला अटक

231

बारामती : एमआयडीसी बारामती परिसरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटनांचा बारामती तालुका पोलिसांनी तपास करत यशस्वी उलगडा केला आहे. या कारवाईत अल्पवयीन मुलांकडून चोरीचा माल खरेदी करणाऱ्या भंगार व्यावसायिकासह एकूण तिघांना अटक करण्यात आली असून, आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत, १३ मार्च रोजी डायनामिक्स कंपनीच्या आवारातील सोलर प्लांटला जोडलेली सुमारे १५ हजार रुपये किमतीची कॉपर केबल चोरीस गेली होती. या प्रकरणी १६ मार्च रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली. या मुलांनी चोरीचा माल भंगार व्यावसायिक मोहम्मद शब्बीर मोहम्मद बशीर अन्सारी (वय ३८) याला विकल्याचे समोर आले. पोलिसांनी अन्सारी याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे १३ किलो तांब्याची तार जप्त केली असून त्याला अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलांना बाल न्याय मंडळासमोर हजर राहण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.

दुसऱ्या घटनेत, ३ मार्च रोजी एमआयडीसीतील हिरकणी रियल इस्टेट प्रा. लि. यांच्या गोदामातून तब्बल ६ लाख ५ हजार रुपये किमतीचा माल चोरीस गेला होता. यामध्ये २ लाख रुपये किमतीची इलेक्ट्रिकल केबल, ५० हजार रुपये किमतीचे पाण्याचे फिटिंग साहित्य, १५ हजार रुपये किमतीचा आरओ, तसेच ३ लाख ४० हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा आणि ट्रान्सफॉर्मर ऑईलचा समावेश होता. या प्रकरणी मच्छिंद्र प्रदीप गव्हाळे, राजू रामा दिवटे, संजय रामा दिवटे आणि सनी भारत पाथरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी राजू रामा दिवटे व संजय रामा दिवटे यांना ५ मार्च रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या गुन्ह्यातील उर्वरित चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सुरू आहे.

दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास पोलीस हवालदार किशोर वीर, राहुल मखरे हे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, किशोर वीर, राहुल मखरे, जितेंद्र शिंदे, मनोज पवार, राहुल लांडगे, सचिन तरंगे आणि आफरीन शेख यांनी केली आहे.

error: Content is protected !!