दप्तर दिरंगाई आणि आर्थिक पिळवणुकीविरुद्ध ‘द केसरी’चा एल्गार
बारामती : बारामती शहर व तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या दप्तर दिरंगाई, कामासाठी होणारी अनाठायी टाळाटाळ आणि काही ठिकाणी होत असलेल्या आर्थिक पिळवणुकीच्या प्रकारांविरोधात आता ‘द केसरी’ आक्रमक भूमिका घेतली आहे. सामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काच्या कामांसाठी वारंवार कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असून, अनेकदा “आज या, उद्या या” अशी उत्तरे देत नागरिकांची मानसिक व आर्थिक छळवणूक केली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.
साधे दाखले, नोंदी, परवाने किंवा इतर प्रशासकीय कामे वेळेत पूर्ण न करता मुद्दाम विलंब लावला जातो, असा आरोप अनेक नागरिकांकडून होत आहे. काही ठिकाणी काम जलद करण्यासाठी ‘खुशाली’च्या नावाखाली पैशांची मागणी केली जात असल्याचाही गंभीर आरोप पुढे येत आहे. या सर्व प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला असून, प्रशासनावरील विश्वास ढासळत चालल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर ‘द केसरी’ पोर्टलने पुढाकार घेत नागरिकांना थेट आपली व्यथा मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ज्या नागरिकांना कोणत्याही शासकीय कार्यालयात कामासाठी दिरंगाई, अडथळे किंवा आर्थिक पिळवणूक सहन करावी लागत असेल, त्यांनी आपले अनुभव, कागदपत्रांसह माहिती पोर्टलकडे किंवा 9096383959 या मोबाईल क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्राप्त तक्रारींची सखोल पडताळणी करून संबंधित सरकारी बाबू व अधिकाऱ्यांचे गैरप्रकार पुराव्यानिशी समोर आणले जाणार आहेत. तसेच, या प्रकरणांचा पाठपुरावा करून संबंधित यंत्रणांकडून कारवाई व्हावी यासाठीही ‘द केसरी’ कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.
“भीती न बाळगता पुढे या, तुमचा आवाज आम्ही बुलंद करू,” असा विश्वासही पोर्टलकडून नागरिकांना देण्यात आला आहे. प्रशासनात पारदर्शकता निर्माण करून भ्रष्टाचाराला आळा घालणे आणि सामान्य नागरिकाला न्याय मिळवून देणे, हेच या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बारामतीकरांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या समस्या मांडाव्यात, जेणेकरून अन्याय करणाऱ्यांचा पर्दाफाश होईल आणि प्रशासन अधिक जबाबदार बनेल, असे आवाहन करण्यात आले आहे.
