March 28, 2026

बारामती शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा उच्छाद

123

बारामती : बारामती शहरातील इंदापूर रोड परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा उच्छाद सुरू असून, मागील चार दिवसांत या कुत्र्याने शंभराहून अधिक नागरिकांना चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

दुकानदार, अल्पवयीन मुले, वृद्ध नागरिक तसेच सकाळी व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्या लोकांनाही या कुत्र्याच्या हल्ल्याला सामोरे जावे लागत आहे. काही गंभीर जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, अद्यापपर्यंत नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

“आमच्या मुलांना घराबाहेर पाठवणेही अवघड झाले आहे. चार दिवस झाले, कुत्रा परिसरातच फिरतो आहे, पण यावर कोणतेही नियंत्रण केले जात नाहीये,” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

या घटनेमुळे नगरपालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा पाहता, नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. आता तरी नगरपालिका याकडे गांभीर्याने लक्ष देणार का ? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

error: Content is protected !!