बदली म्हणायचं का बदलीची नौटंकी? बारामतीत अवैध धंद्यांना पुन्हा अभय?
बारामती : प्रशासन नेमकं चाललंय तरी कसं, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत. बेकायदा वैभव कमावल्याचे आरोप असलेला एक कर्मचारी तालुक्यातील एका पोलीस स्टेशनमधून दुसऱ्या पोलीस स्टेशनला बदली करून गेला. त्याचप्रमाणे गोरखधंदा चालवणारा असल्याचे आरोप असलेला दुसराही कर्मचारी त्याच पोलीस स्टेशनला बदली करून गेला. मात्र ही बदली तालुक्यातल्याच तालुक्यात झाल्याने त्यांच्या कथित गोरखधंद्यांना आणि वसुलीला काहीच फरक पडला नाही.
फरक पडला तो फक्त कर्तव्यावर कर्मचारी नसलेल्या पोलीस ठाण्याला. ज्या ठिकाणी मनुष्यबळाची गरज आहे, तिथे कर्मचारी न देता केवळ नावालाच बदल्या करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे याला बदली म्हणायचं की बदलीची नौटंकी, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
ही नौटंकी संपते ना संपते तोच तालुक्यातील दुसरे आळे नामक कर्मचारीही चर्चेत आले आहेत. बंद झालेले कथित अवैध धंदे पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न संबंधित आळे नामक कर्मचारी यांनी सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत असून, “काळजी नका करू, मी आलोय आता बारामतीला,” वरीष्ठ अधिकारी यांनीच मला हे सांगितले आहे अशा रुबाबात अवैध धंद्यांना अभय देण्याचे खटाटोप सुरू झाल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे.
बारामतीत सुरू असलेल्या या घडामोडींमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
