June 7, 2026

बारामतीत ‘गुलाम’ गुटख्याचे गूढ; कोट्यवधींच्या उलाढालीमागे नेमके कोण?

file_0000000024447208b28a1cef73da8e22

बारामती : बारामती शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विक्री होत असलेल्या ‘गुलाम’ नावाच्या गुटख्याबाबत दिवसेंदिवस नवीन चर्चा समोर येत असून, या गुटख्याच्या पुरवठा साखळीमागे नेमके कोण आहे, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आणि संशय वाढत आहे. शहरातील अनेक पानटपऱ्या, किराणा दुकाने तसेच ग्रामीण भागातील विक्री केंद्रांवर हा गुटखा सहज उपलब्ध होत असल्याचे दिसून येत असून, त्याची महिन्याला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा सुरू आहे.

विशेष म्हणजे, या गुटख्याची अधिकृत कंपनी नेमकी कुठे आहे, त्याचे उत्पादन कोणत्या राज्यात किंवा कारखान्यात केले जाते, याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर येत नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हा गुटखा बारामतीत येतो कुठून आणि त्याचा पुरवठा कोणाच्या माध्यमातून केला जातो, हा मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.

स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या चर्चेनुसार, बारामती तालुक्यातील मळद या छोट्याशा गावातून या गुटख्याचा मोठ्या प्रमाणावर साठा आणि वितरण होत असल्याचा दावा केला जात आहे. येथून बारामती शहर, ग्रामीण भाग तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणी माल पाठविला जात असल्याची चर्चा असून, यामागील संपूर्ण यंत्रणा कोणाच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहे, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

काही नागरिकांनी आमच्याशी बोलताना असा दावा केला की, बाजारात उपलब्ध असलेला ‘गुलाम’ गुटखा भेसळयुक्त अथवा डुप्लिकेट पद्धतीने तयार केला जात असावा. मात्र, या दाव्यांना अधिकृत दुजोरा मिळालेला नसून, याबाबत संबंधित विभागांनी तपास करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री आणि पुरवठा सुरू असताना संबंधित यंत्रणांना याची माहिती नसणे अशक्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. वेळेत कठोर कारवाई झाली नसल्यास गुटखा साखळी अधिक मजबूत होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांनी इशारा देताना सांगितले की, “बारामती आणि परिसरातील युवकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या कथित गुटखा साम्राज्याविरोधात प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. पुरवठा साखळीचा पर्दाफाश करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा सामाजिक संघटना आणि जागरूक नागरिकांच्या वतीने जनआंदोलन उभारले जाईल.”

गेल्या काही काळापासून बारामतीत गुटखा विक्री आणि साठवणुकीबाबत विविध चर्चा सुरू असताना आता ‘गुलाम’ गुटख्याचे नाव पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन, पोलीस विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

You may have missed

error: Content is protected !!