April 16, 2026

बारामतीत बेकायदेशीर बाऊन्सरगिरीचा धुमाकूळ; विना परवाना सुरक्षा पुरवठा

143891995-big-muscled-bouncer-vector-icon

बारामती : बारामती शहर आणि परिसरात सध्या बेकायदेशीर बाऊन्सरगिरी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राजकीय पंढरी म्हणून ओळख असलेल्या बारामतीत नेहमीच विविध राजकीय नेते, व्हीआयपी आणि मोठे कार्यक्रम यांची लगबग असते. या कार्यक्रमांना ‘ग्लॅमर’ आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बाऊन्सरची नियुक्ती केली जाते. मात्र, या बाऊन्सर सेवेच्या नावाखाली बेकायदेशीर कृत्ये आणि दहशत माजवण्याचे प्रकार घडत असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती शहर व तालुका पोलीस ठाण्यात खाजगी सुरक्षा यंत्रणा (बाऊन्सर सेवा) संदर्भात कोणत्याही संस्थेची अधिकृत नोंदणी किंवा परवाना उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. यामुळे या व्यवसायाचे संपूर्ण कामकाज बेकायदेशीर पद्धतीने सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
अधिक चिंताजनक बाब म्हणजे, काही ठिकाणी या बाऊन्सरचा वापर केवळ सुरक्षेसाठी न होता दहशत निर्माण करण्यासाठी केला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

या संदर्भात बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट इशारा दिला. “खाजगी सुरक्षा सेवा देणाऱ्या संस्थांनी शासनाच्या नियमांनुसार अधिकृत नोंदणी करूनच व्यवसाय करावा. अन्यथा बेकायदेशीरपणे बाऊन्सर सेवा पुरवताना आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील,” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकारामुळे बारामतीत कायद्याचा धाक कमी होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करून बेकायदेशीर बाऊन्सरगिरीला आळा घालावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

या बेकायदा बाऊन्सर ( खाजगी सुरक्षा यंत्रणेसंदर्भात) द केसरी च्या माध्यमातून तक्रारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.

error: Content is protected !!