April 16, 2026

अमृता लॉज’वर पोलिसांची धाड; देहव्यवसाय उघडकीस, दोघे जेरबंद

IMG_20260415_194612

बारामती : बारामती तालुक्यातील वंजारवाडी परिसरात सुरू असलेल्या अवैध देहव्यवसायावर बारामती तालुका पोलिसांनी अचूक नियोजन करत मध्यरात्री छापा टाकत मोठी कारवाई केली. या धाडीत लॉज चालकासह दोन जणांना अटक करण्यात आली असून पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार १४ एप्रिल रोजी पहाटे पोलिसांनी ‘अमृता लॉज’ ( सोमनाथ हॉटेल )  येथे बोगस ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व उपनिरीक्षक रामहरी भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पंचांच्या उपस्थितीत छापा टाकत लॉजमधील खोल्यांची तपासणी केली.
तपासणीदरम्यान काही खोल्यांमध्ये महिला व ग्राहक एकत्र आढळून आल्याने संशय बळावला. पुढील चौकशीत आरोपी बाहेरून महिलांना बोलावून त्यांच्यामार्फत देहव्यवसाय चालवत असल्याचे स्पष्ट झाले. ग्राहकांकडून पैसे उकळून त्यातून आर्थिक फायदा घेत असल्याचेही समोर आले.

या प्रकरणी अजित जयसीन शेट्टी (३८, लॉज चालक) व चाँद कलाम आलम (२०) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच पश्चिम बंगाल येथील तीन व भिवंडी येथील दोन अशा एकूण पाच महिलांची सुटका करून त्यांना सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
कारवाईवेळी रोख रक्कम, मोबाईल फोन, व ग्राहकांची नोंद असलेले रजिस्टर पोलिसांनी जप्त केले आहे.

याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

error: Content is protected !!