June 27, 2026

विकासकामे करीत असताना नागरिकांनी सहकार्य करावे  उपमुख्यमंत्री अजित पवार आवाहन

Photo DCM Programme vastu vatap (1) (2)
बारामती  :  विविध विकासकामांच्या माध्यमातून बारामती तालुक्याच्या सर्वागिण विकास करुन  नागरिकांना उत्तम सोईसुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत; आगामी काळातही विविध विकासकामे कामे करावयाची असून त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
बारामती येथे अर्जून प्रतिष्ठान व स्व. वस्ताद बाजीराव काळे तालिम दहिहंडी संघातर्फे गरजू विद्यार्थ्यांनीना सायकल, महिलांना शिलाई व साडी वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, मा.उपनगराध्यक्ष राजेंद्र बनकर, मा. नगरसेवक बाळासाहेब जाधव, मा.उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, मा. नगरसेवक समीर चव्हाण, मा. नगरसेवक अभिजित चव्हाण, अर्जून प्रतिष्ठान व स्व. वस्ताद बाजीराव काळे तालिम दहिहंडी संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.ऋतुराज काळे,  डॉ गोकुळ काळे, डॉ रंजीत मोहिते, सुनील काळे, अपर पोलीस पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे,  न.प.चे मुख्याधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते.
 पवार म्हणाले, बारामती परिसरातील नागरिकांचे उत्तम आरोग्य राखण्यासाठी अत्याधुनिक आरोग्य सुविधा असलेले महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि गरजू नागरिकांना घरे मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परिसर विकासाच्यादृष्टीने विविध दूरगामी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये मेडद येथील आयुर्वेदिक महाविद्यालय, नवीन बसस्थानक, परकाळे बंगला येथील कालवा सुशोभिकरण, चिल्ड्रन पार्क, श्रीमंत बाबुजी नाईक वाडा शुभोभिकरण, कऱ्हा नदी शुभोभिकरण, नवीन प्रशासकीय भवनाच्या शेजारी सेंट्रल पार्क, रस्ते बांधणी अशी विविध विकास कामे सुरु आहेत.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जुन्या भाजी मंडईचे गाळे पाडण्यात आले असून तेथील गाळे धारकांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. नवीन व्यापारी संकुल बांधण्यासाठी ६५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. गाळेधारक, ग्राहकांची सुरक्षितता, वाहनतळ आदी बाबीचा विचार करुन व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे.
नागरिकांच्या सोईच्यादृष्टीने अत्याधुनिक स्मशानभूमी उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. आगामी काळात परिसरातील नागरिकांना सोई-सुविधा मिळण्यासाठी उद्यान, बगीचे, क्रीडांगण उभारण्यात येणार आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था मदत करीत आहेत. सार्वजनिक विकासकामे दर्जेदार, गतीने वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.
महिलांना समाजात प्रतिष्ठा, मानसन्मान प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न
महिलांना समाजात प्रतिष्ठा, मानसन्मान प्राप्त करुन दिल्याशिवाय  प्रगती होत नाही. महिलांचे राष्ट्र निर्मितीच्या कामात मोठे योगदान आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणाच्यादृष्टीने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.  केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.
डॉ ऋतुराज काळे  यांचे परिसरातील सामाजिक कार्यात मोठे योगदान
स्व. वस्ताद बाजीराव काळे यांनी कुस्ती क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली होती तसेच सामाजिक कार्यात योगदान दिले होते. डॉ.ऋतुराज काळे नेहमीच सामाजिक कार्याच्या माध्यमातून बारामती परिसराच्या विकासासाठी नेहमी कार्यरत असतात. स्व. वस्ताद बाजीराव काळे यांचा वारसा डॉ. ऋतुराज काळे हे पुढे चालवीत आहेत असे व्यक्त करीत डॉ ऋतुराज काळे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करीत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल कौतुक केले.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनीना सायकल, महिलांना शिलाई व साड्याचे वाटप करण्यात आले. तर यावेळी माजी जेष्ट नगरसेवक किरण गुजर यांनी आपले विचार व्यक्त केले.

You may have missed

error: Content is protected !!