बारामतीत थार चालकाची मुजोरी; वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातली गाडी
बारामती : बारामती शहरात वाहतूक पोलिसाच्या अंगावर वाहन घालण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील संम्यक चौकात वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला काळ्या काचांच्या थार चालकाने भरधाव वाहन अंगावर घातल्याने पोलीस कर्मचारी दत्तात्रय भोसले जखमी झाले आहेत.
या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त होत असून, वाहतूक पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संम्यक चौकात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलीस कर्मचारी दत्तात्रय भोसले वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्तव्य बजावत होते. यावेळी त्यांच्या निदर्शनास काळ्या काचांची थार गाडी आली. संबंधित वाहनाबाबत कारवाई करण्यासाठी अथवा तपासणीसाठी त्यांनी चालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने बेदरकारपणे वाहन चालवत थेट अंगावर थार घातल्याचा प्रकार घडला.
या धडकेत पोलीस कर्मचारी दत्तात्रय भोसले यांना दुखापत झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसालाच वाहनाने धडक देण्याचा हा प्रकार गंभीर असून, संबंधित चालकाच्या मुजोरीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
नियम धाब्यावर बसविणाऱ्या आणि पोलिसांच्या कर्तव्याला आव्हान देणाऱ्या चालकांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात थार चालक धिरज शेडगे गाडी क्रमांक MH 53 A 4400 यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
