खंडणीसाठी गोळीबार? बारामतीत उद्योजकाच्या गाडीवर गोळीबार
बारामती : बारामतीतील गोळीबाराच्या घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र समोर येत आहे. एमआयडीसीपासून काही अंतरावर असलेल्या शिवशंभूनगर परिसरात अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली. राजन कोळेकर या तरुण उद्योजकाच्या गाडीवर दोन गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, नागरी वस्तीत घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, राजन कोळेकर यांच्याकडे इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दोन लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली , या खंडणीच्या मागणीचा आणि गोळीबाराच्या घटनेचा परस्पर संबंध आहे का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे.
राणा सूर्यवंशी प्रकरणानंतर पुन्हा गोळीबार…
राणा सूर्यवंशी यांच्यावरील कथित हल्ल्याचे प्रकरण ताजे असतानाच बारामतीत पुन्हा गोळीबाराची घटना घडली आहे. सूर्यवंशी प्रकरणात गोळीबार झाला होता की नाही, तसेच त्या प्रकरणाच्या तपासात नेमके काय निष्पन्न झाले, याबाबतची माहिती अद्याप स्पष्टपणे समोर आलेली नाही. अशातच एमआयडीसी परिसरालगत पुन्हा गोळीबार झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नागरी वस्तीत खुलेआम गोळीबाराच्या घटना घडत असतील, तर सर्वसामान्य नागरिकांनी सुरक्षिततेची अपेक्षा कोणाकडून करायची, असा सवाल उपस्थित होत आहे. या घटनेमागील नेमके कारण, खंडणीच्या मागणीचा संबंध आणि गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
