July 13, 2026

बदनामीकारक वृत्तप्रसारण भोवले; बारामतीतील डॉक्टरांच्या तक्रारीवरून पत्रकाराविरुद्ध गुन्हा, अब्रूनुकसानीच्या दाव्याचीही तयारी

IMG_20260713_231905

बारामती  : सोशल मीडियावर आणि एका न्यूज वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या कथित बदनामीकारक वृत्तामुळे बारामतीतील मेडीकेअर (मेहता) मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. विशाल मेहता यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यावरून संबंधित संकेतस्थळाचे पत्रकार सागर सूर्यवंशी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याचबरोबर अब्रूनुकसानीसाठी स्वतंत्र दिवाणी दावा दाखल करण्याची तयारीही सुरू असल्याचे डॉ. मेहता यांनी स्पष्ट केले.

फिर्यादीनुसार, ११ जुलै रोजी संबंधित http://www.baramatinewsnetwork.online  वेबसाईटवर तसेच विविध समाजमाध्यमांवर डॉ. मेहता आणि त्यांच्या रुग्णालयाविषयी अत्यंत आक्षेपार्ह, दिशाभूल करणारी आणि बदनामीकारक माहिती प्रसिद्ध करण्यात आली. या बातमीत डॉ. मेहता, त्यांच्या पत्नी तसेच रुग्णालयाचे छायाचित्र विनापरवानगी वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच बातमीमध्ये वापरण्यात आलेले “डॉक्टर की कसाई”, ” माफिया”, “नराधम”, “काळा चेहरा” यांसारखे शब्द केवळ बदनामी करण्याच्या उद्देशाने वापरण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी आपली बाजू जाणून घेण्याचा किंवा कोणतेही स्पष्टीकरण मागविण्याचा प्रयत्न करण्यात आला नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
डॉ. मेहता यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, कोणत्याही वैद्यकीय चौकशी समितीने, सक्षम प्राधिकरणाने किंवा न्यायालयाने दोष निश्चित केलेला नसताना त्यांना दोषी ठरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या वैद्यकीय व्यवसायावर, रुग्णालयाच्या विश्वासार्हतेवर आणि सामाजिक प्रतिष्ठेवर गंभीर परिणाम झाला असून मानसिक त्रासासह व्यावसायिक नुकसानही सहन करावे लागत आहे.

याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात संबंधित कायदेशीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, डॉ. मेहता यांनी फौजदारी कारवाईबरोबरच मोठ्या रकमेचा अब्रूनुकसानीचा दावा न्यायालयात दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचेही सांगितले आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांवर बातमी प्रसिद्ध करताना तथ्यांची पडताळणी करणे, संबंधितांची बाजू घेणे आणि पत्रकारितेची आचारसंहिता पाळणे किती आवश्यक आहे, याबाबत सोशल मीडिया वापरकर्ते यांनी अभ्यास करूनच वार्तांकन करणे आवश्यक आहे .

You may have missed

error: Content is protected !!