चित्रपट स्टाईलने अपहरण करीत, पिस्तूल-चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याचा प्रयत्न
बारामती : घरातील महिलेला मेसेज पाठवत असल्याच्या संशयातून एका २३ वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सुपा परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी सुपा पोलिसांनी दोघांविरुद्ध अपहरण, जीवघेणा हल्ला तसेच हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
ऋषिकेश चांदगुडे (रा. दंडवडी, ता. बारामती) असे जखमी तरुणाचे नाव असून, ओंकार प्रकाश भोसले व तन्मेश सुधीर साळुंखे (दोघे रा. बारामती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी शनिवारी सायंकाळी ऋषिकेश चांदगुडे याला सुपा-मोरगाव मार्गावरील चतुर्थी हॉटेल परिसरात बोलावून घेतले. त्यानंतर फॉरेस्ट गेट परिसरात त्याला पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवून पुण्याच्या दिशेने नेण्यात आले.
प्रवासादरम्यान आरोपींनी ऋषिकेश याच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने वार चुकविण्याचा प्रयत्न केल्याने चाकू त्याच्या डाव्या भुवईजवळ लागला आणि तो जखमी झाला. यानंतर आरोपींनी त्याला दिवेघाटाच्या पायथ्याशी नेऊन बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ऋषिकेश याने आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेतली. त्यानंतर त्याने मित्राच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपींचा शोध घेतला.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस फौजदार जगताप यांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक दिनेश कोळी पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असून, घटनेमागील नेमके कारण आणि वापरण्यात आलेल्या शस्त्रांबाबत अधिक तपास सुरू आहे. पत्नीला मेसेज पाठविल्याच्या संशयातून हा संपूर्ण प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, या घटनेमुळे बारामती व सुपा परिसरात खळबळ उडाली आहे.
