पश्चिम बंगालचा ‘अघोरी बाबा’ बारामतीत सक्रिय? शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
बारामती : अंधश्रद्धा, खोटे तांत्रिक उपाय, काळी विद्या दूर करण्याचे आमिष दाखवत महिलांची आर्थिक व मानसिक फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध बारामती शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मौलाना अब्दुल हलीम शेख व त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध अंधश्रद्धा पसरवणे, आर्थिक फसवणूक, महिलेशी गैरवर्तन, विनयभंगाचा प्रयत्न तसेच धमकी दिल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
विशेष म्हणजे संबंधित आरोपी हा मूळ पश्चिम बंगाल येथील असल्याची माहिती समोर आली असून, तेथील मशिद परिसरात देखील अशाच प्रकारचे अघोरी व संशयास्पद प्रकार करत असल्याने स्थानिकांनी त्याला हकलून लावल्याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर आरोपीने बारामतीत येत फलटण रोड परिसरात आपला “दरबार” सुरू केल्याचे बोलले जात आहे. अल्पावधीतच मोठा आर्थिक व्यवहार उभा करत त्याने फलटण रोड परिसरात आलिशान बंगला उभारल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
“दरबार”च्या नावाखाली भीतीचे वातावरण.
बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिलेने दिलेल्या माहितीनुसार आरोपी अब्दुल हलीम शेख हा स्वतःला मौलाना, धार्मिक व तांत्रिक उपाय करणारा, काळी विद्या दूर करणारा तसेच कौटुंबिक, आर्थिक व व्यावसायिक अडचणी दूर करणारा असल्याचे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करत होता. “दरबार” भरवून नागरिकांमध्ये भीती निर्माण करत तथाकथित धार्मिक व तांत्रिक उपायांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा घेत असल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे.
ऑनलाइन व्यवहार, चॅट आणि कॉल रेकॉर्ड पोलिसांच्या हाती
फिर्यादी महिलेकडून आरोपी व त्याच्या संबंधित व्यक्तींनी विविध वेळेस रोख रक्कम, धनादेश तसेच ऑनलाइन व्यवहाराद्वारे मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचे निष्पन्न झाले आहे. या संदर्भातील मिळालेल्या माहितीनुसार आधारे सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
तपासादरम्यान आरोपीच्या आर्थिक व्यवहारांबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अंधश्रद्धा व भीती निर्माण करून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्याचा हा संघटित प्रकार असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
महिलेशी गैरवर्तन व विनयभंगाचा प्रयत्न
तसेच आरोपीने तथाकथित तांत्रिक उपाय करण्याच्या नावाखाली फिर्यादी महिलेस रात्री-अपरात्री बोलावून तिच्याशी गैरवर्तन करत विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. “काळी विद्या करेन”, “तुझ्या कुटुंबाला त्रास होईल”, “वाईट परिणाम होतील” अशा प्रकारच्या धमक्या देऊन महिलेमध्ये मानसिक भीती निर्माण करण्यात आल्याचेही उघड झाले आहे.
गुन्हा दाखल होताच आरोपी फरार
दरम्यान, आरोपीस गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मिळताच तो गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पळून गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आरोपीचा मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स, आर्थिक व्यवहार तसेच इतर इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे बारामती शहर पोलीस त्याचा शोध घेत असून तांत्रिक तपास युद्धपातळीवर सुरू आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव करीत आहेत.
आरोपीस अटक केल्यानंतर त्याने इतर महिलांनाही अशाच प्रकारे अंधश्रद्धा, तांत्रिक उपाय, आर्थिक फसवणूक, धमकी किंवा गैरवर्तनाच्या माध्यमातून फसवले आहे काय, याचाही बारामती शहर पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत अन्य कोणत्याही महिला अथवा नागरिकांची अशाच प्रकारे अंधश्रद्धा, काळी विद्या, तांत्रिक उपाय, धार्मिक भीती, संकट निवारण किंवा आर्थिक फसवणुकीच्या माध्यमातून फसवणूक झाली असल्यास त्यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे प्रत्यक्ष हजर राहून माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. संबंधित नागरिकांची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, अशी ग्वाहीही पोलीस प्रशासनाने दिली आहे.
सध्याच्या काळात सोशल मीडिया, मोबाईल संपर्क, ऑनलाइन व्यवहार तसेच खोट्या धार्मिक व तांत्रिक उपायांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक आणि मानसिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांनी अशा भोंदूगिरी, अंधश्रद्धा व खोट्या आश्वासनांना बळी पडू नये, असे आवाहन बारामती शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी केले आहे.
