April 16, 2026

कोयत्याने हल्ला करून प्रेमी युगलाला लुटणारा आरोपी जेरबंद

IMG_20260416_190140

बारामती : तांदुळवाडी येथील एलसी कंपनी लेक परिसरात कोयत्याने हल्ला करून प्रेमी युगलाला लुटणाऱ्या आरोपीला अखेर बारामती तालुका पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सोन्याची साखळी जप्त करण्यात आली आहे.

दि. १६ जून २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास फिर्यादी तरुण आपल्या मैत्रिणीसोबत तांदुळवाडी विमानतळ रोडलगत असलेल्या एलसी कंपनी लेक परिसरातील मोकळ्या जागेत बसला होता. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी तोंडाला रूमाल बांधून अचानक हल्ला चढवला. यातील एका आरोपीने मोबाईल व पैसे देण्याची मागणी केली. मात्र त्यांनी विरोध केल्याने आरोपीने लोखंडी कोयत्याने तरुणाच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर व मांडीवर वार करून त्याला जखमी केले.
यानंतर आरोपींनी जबरदस्तीने फिर्यादीकडील २,५०० रुपये रोख रक्कम व मोबाईल हिसकावून घेतला. तसेच त्याच्या मैत्रिणीच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळीही काढून घेतली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी त्यांच्या मोटारसायकलची चावी घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.

या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यानंतर आरोपी फरार होते. मात्र पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत अजय नंदकुमार सकट (रा. तांदुळवाडी, ता. बारामती) याला दि. १५ एप्रिल २०२६ रोजी अटक केली. अटक आरोपीकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीची ४.९०० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हस्तगत करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील व पोलीस अंमलदार राजू बन्ने करीत आहेत.

error: Content is protected !!