बारामतीत पुन्हा गुटखा विक्रीचा सुळसुळाट; ‘दत्त’च्या नावाने बेकायदा व्यापार?
बारामती : बारामती शहरात पुन्हा एकदा गुटखा विक्रीचा सुळसुळाट वाढल्याचे चित्र समोर येत असून, एका दुकानदाराने चक्क दत्ताच्या नावाने दुकान सुरू करून गुटख्याचा मोठ्या प्रमाणात बेकायदा व्यापार सुरू केल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. सदर दुकानदाराने “गुलाम” नावाने गुटख्याचे मोठे जाळे उभे केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दुकानदार हा बारामतीतील वसंतनगर परिसरातील रहिवासी असून त्याने शहरात तसेच औद्योगिक क्षेत्र असलेल्या एमआयडीसी परिसरात गुटखा पुरवठ्याचे मोठे नेटवर्क तयार केले असल्याचे बोलले जात आहे. काही ठिकाणी किरकोळ विक्रेत्यांमार्फत गुटखा पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आल्याने हा अवैध व्यवसाय दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही बारामतीत अशा प्रकारे खुलेआम गुटखा विक्री होत असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे, काही जणांना पैशाचे आमिष दाखवून हा व्यवसाय चालवला जात असल्याचीही चर्चा शहरात सुरू आहे. त्यामुळे या गुटखा माफियाने शहरात मोठे आर्थिक जाळे उभे केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर बारामती शहर आणि एमआयडीसी परिसरात गुटखा विक्रीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. “आम्ही प्रामाणिकपणे व्यवसाय करून कष्टाने पैसे कमावतो, मात्र काही जण बेकायदा मार्गाने गडगंज होत आहेत. अशा गुटखा माफियांवर प्रशासन कारवाई करणार का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, शहरात सुरू असलेल्या या बेकायदा गुटखा विक्रीच्या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बारामतीकर नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. आता पोलीस प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
