बारामतीत रेशन तांदळाची अवैध वाहतूक उघडकीस; दोघांवर गुन्हा दाखल
बारामती : मोरगाव येथे नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी रेशनिंगच्या तांदळाचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न उधळून लावत मोठी कारवाई केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2 मार्च रोजी सायंकाळी सुमारे ५:४५ वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक कोळी व त्यांचे पथक सुपा पोलीस स्टेशन हद्दीत मोरगाव चौकात नाकाबंदी करत होते. त्यावेळी अशोक लेलँड कंपनीचे MH 42-7472 क्रमांकाचे चारचाकी वाहन संशयास्पदरीत्या जाताना दिसल्याने पोलिसांनी ते थांबवून तपासणी केली.
तपासणीदरम्यान वाहनामध्ये रेशनिंगच्या बॅगांमध्ये भरलेला तांदूळ आढळून आला. सुरुवातीला वाहनचालक अभय अशोक भोसले (वय २२, रा. खराडेवाडी, ता. बारामती) याने मार्च महिन्याचे परमिट असलेले 119 बॅग (49.50 क्विंटल) तांदूळ खराडेवाडी येथे घेऊन जात असल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्ष तपासणीत वाहनात 80 कट्टे म्हणजेच सुमारे 40 क्विंटल तांदूळ आढळून आला.
हा तांदूळ शासकीय शिक्का असलेल्या रेशनिंग बॅगमध्ये असल्याचे स्पष्ट झाले. अधिक चौकशी केली असता, सदर तांदूळ माळेगाव येथील शासकीय धान्य गोदामातून भरून खराडेवाडी येथील वैभव बाळासो खराडे (वय ३२) यांच्या सांगण्यावरून खाजगी दुकानदाराला विक्री करण्यासाठी नेत असल्याची कबुली चालकाने दिली.
या प्रकरणी अभय अशोक भोसले व वैभव बाळासो खराडे या दोघांविरुद्ध सुपा पोलीस ठाण्यात आवश्यक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
