March 19, 2026

माळेगावात भरदिवसा हल्ला; युवक गंभीर जखमी

IMG_20260319_192722

बारामती : माळेगाव येथे भरदिवसा घडलेल्या मारहाणीच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चार जणांच्या टोळक्याने दिलीप जगताप या युवकावर अचानक हल्ला करून बेदम मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना टाके पडले आहेत.

ही घटना बुधवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी माळेगाव येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समोर घडली. दिलीप जगताप हे नेहमीप्रमाणे आपल्या कामानिमित्त त्या परिसरात आले असताना अचानक चार जणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

हल्लेखोरांनी लाथाबुक्क्यांसह कठोर वस्तूंचा वापर करत त्यांना बेदम मारहाण केली. डोक्याला गंभीर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आरोपी मोकाट फिरत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, माळेगावसारख्या ठिकाणी भरदिवसा अशी घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. “गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक उरला आहे का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

कडक कारवाईची मागणी

या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही मत व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!