बारामतीत हॉस्पिटलमध्ये चोरी; १५ लाखांची रोकड लंपास
बारामती : बारामती शहरातील भिगवण रोड परिसरात असलेल्या संगवी टाऊनशिपमधील ‘प्रिझ्मा आय केअर’ हॉस्पिटलमध्ये अज्ञात चोरट्याने पहाटेच्या सुमारास घुसून सुमारे १५ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि. १३ मार्च २०२६) रोजी सकाळी सुमारे ६.२० वाजण्याच्या सुमारास भिगवण रोडवरील संघवी टाऊनशिप येथील ‘प्रिझ्मा आय केअर’ हॉस्पिटलमध्ये अज्ञात इसमाने मुख्य दरवाजाच्या लॉकजवळील ग्रॅनाईटची चौकट फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर हॉस्पिटलमधील ड्रॉवर उचकटून सुमारे १५ लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.घटनेची माहिती समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांकडून घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. विशेष पथकाच्या माध्यमातूनही शोधमोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर पोलिसांनी नागरिक, व्यापारी, हॉस्पिटल व क्लिनिक चालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मोठ्या प्रमाणात रोख रक्कम कार्यालय किंवा व्यावसायिक ठिकाणी न ठेवणे, परिसरात कार्यरत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, सुरक्षित लॉकिंग व अलार्म सिस्टीमचा वापर करणे तसेच रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षकाची व्यवस्था ठेवणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तसेच परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास त्वरित बारामती शहर पोलीस ठाणे किंवा आपत्कालीन क्रमांक ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. बारामती शहर पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.
