February 11, 2026
1122

बारामती : बारामतीत विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित दादांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला राज्याने कार्यक्षम, धडाडीचे, कडक आणि शिस्तप्रिय नेते म्हणून परिचित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन सकाळी पावणे नऊ वाजता बारामतीत विमान अपघातात झाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर चार जणांचा देखील दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे ही दुर्दैवी घटनेत अवघा महाराष्ट्र शोक सागरात बुडवला राज्यात तीन दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. घटना समजल्यानंतर अवघी बारामती घटनास्थळी दाखल झाली होती अत्यंत गंभीर अवस्थेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जखमींना बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल केले. राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या अनेक दशकापासून सातत्याने चर्चेत राहिलेले धडाडीचे, शिस्तप्रिय नेतृत्व म्हणजेत अजित पवार , मात्र दादांच्या या अकाली जाण्याने पवार कुटुंबांसह अवघ्या राज्याला दुःखाचा धक्का दिला आहे.

राज्याच्या राजकारणात सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री म्हणून राहण्याचा विक्रम अजित पवार यांच्याच नावे आहे, सध्या राज्याची अर्थ खात्याची धुरा सुद्धा त्यांच्याच खांद्यावर होती, प्रशासनावर असलेली त्यांची पकड दूरदृष्टी, शिस्त असा अष्टपैली धुरंदर नेता, सडेतोड आणि स्पष्ट बोलणारा नेता, आपल्याला जे पटतं तेच आपण बोलतो असं प्रांजळपणे कबूल करण्याला करणारा नेता हरपल्याने अवघा महाराष्ट्र दुःख सागरात लोटला आहे.
असे नेतृत्व पुन्हा नाही. दादा हे फक्त नावापुरतेच दादा नव्हते तर त्यांच्या घरातल्या व्यक्तींपासून ते कार्यकर्त्यांना जागेवर सुनावणारे दादा, थेट राजकीय विरोधकांनाही त्याच भाषेत सुनावणारे दादा अशा एकना अनेक पैलू दादांच्या व्यक्तिमत्त्वात होत्या त्यामुळे दादांचा दबदबा राजकारण आणि समाजकारणात नेहमीच राहिला.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा सकाळी बारामती मध्ये भीषण अपघात झाला बारामती विमानतळा नजीक विमान लँडिंग करीत असतानाच्या प्रयत्नात विमान शेजारच्या शेतात जाऊन कोसळले आणि विमानाला भीषण आग लागली ही दुर्घटना एवढी भीषण होती या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह या विमानात असलेल्या पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला या विमानात खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचे सुरक्षा अधिकारी विधिप जाधव, पायलट सुमित कपूर, को पायलट संभावी पाठक आणि अटेंडंट पिंकी माळी आदींचा देखील यात मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार हे कॅबिनेट बैठकीसाठी मुंबईत आले होते त्यानंतर ते सकाळी मुंबईहून खाजगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते सकाळी पावणे नऊच्या सुमारास बारामती विमानतळावर त्यांचे विमान लँडिंगच्या प्रयत्नात असताना विमानात तांत्रिक कारणामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात कोसळले, विमानाने क्षणार्धत्याने भीषण पेट घेतला बघता-बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष स्थानी पडले आणि जळून खाक झाले या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली, आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी गेली, आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि आगीच्या लोळात सापडलेले सर्व देह बाहेर काढण्यात आले.

सुरुवातीला काही काळ दादा या अपघातात आहेत का नाही याची शक्यता वर्तव्यत जात होती मात्र काही काळानंतर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार अपघातात होते याची पुष्टी त्यांचे घड्याळ, गॉगल, आणि जॅकीटामुळे झाली. या घटनेने महाराष्ट्राचा राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे तर ज्या ठिकाणी अपघातग्रस्त आणण्यात आले होते त्या वैद्यकीय महाविद्यालयात कार्यकर्ते , नागरिक राजकीय नेते आप्त यांनी मोठी गर्दी केली होती उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते.

लोकाभिमुख’ नेता,राजकीय क्षितिजावरील एक तेजस्वी तारा निखळला

​महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात, प्रशासनावर जरब असणारे कणखर नेतृत्व आणि जनसामान्यांचे लाडके ‘ दादा ‘, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे अपघाती निधन झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावून जाणारी आहे. दादा म्हणजे…. पहाटेच्या वेळी कामाला सुरुवात करणारा हा ‘लोकाभिमुख’ नेता आज शांत झाला. बारामतीपासून मंत्रालयापर्यंत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या दादांनी नेहमीच विकासाला प्राधान्य दिले. सडेतोड बोलणे आणि दिलेला शब्द पाळणे ही त्यांची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात सदैव अजरामर राहील. ​दादा तुमच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील एक तेजस्वी तारा निखळला आहे. शिस्त, स्पष्टवक्तेपणा आणि अहोरात्र कष्ट करण्याची तुमची वृत्ती आम्हा सर्वांसाठी कायम प्रेरणादायी असेल. राज्याच्या विकासातील दादांचे योगदान कधीही विसरता येणारे नाही.

अजित दादा परत या,…कार्यकर्त्यांनी आक्रोश

अजित पवार यांचे पार्थिव ठेवण्यात आलेल्या बारामती मेडिकल कॉलेज परिसरात तुफान गर्दी झाली असून ‘अजित दादा परत या,’ अशा घोषणा देत महिलां आणि कार्यकर्त्यांनी आक्रोश व्यक्त केला. तसंच अनेकजण अजितदादांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी ठाण मांडून बसले. ‘एकच वाद, अजित दादा,’ ‘अजितदादा अमर रहे,’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

बारामतीत स्म्शाण शांतता.

बारामती आणि परिसरात या दुर्दैवी घटनेमुळे स्मशान शांतता पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे . नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला .अक्षरशः वैद्यकीय आपत्कालीन रुग्णा व्यातिरिक्त पेट्रोल पम्प सुद्धा बंद करण्यात आले होते

उद्या सकाळी अंत्यविधी .

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठान येथील प्रांगणात ठेवण्यात आले, असून उद्या सकाळी ९ वाजता अंत्ययात्रा निघणार असून सकाळी ११ वाजता अंत्यविधी करण्यात येणार असल्याची माहिती माजी जेष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी दिली

अजित पवार ह्यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का….खा .शरद पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात. असे खा . शरद पवार यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले .

पुढे पवार म्हणाले की , मी प्रसिद्धी माध्यमांसमोर येणार नव्हतो मात्र काही माध्यमांमध्ये ह्या अपघातामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली, असं कळलं. पण ह्यात राजकारण नाही हा निव्वळ अपघात आहे. ह्या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया ह्यात राजकारण आणू नये. एवढंच सांगायचं आहे. असेही पवार म्हणाले .

राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

यावेळी केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजारापू, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, महिला व बाल विकास मंत्री कु. अदिती तटकरे, बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले,आमदार राहूल कुल, यांच्यासह ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांनी खासदार सुनेत्रा पवार यांची भेट घेवून सांत्वन केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे,ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार उपस्थित होते.

error: Content is protected !!