June 27, 2025

एअरटेलच्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे महावितरणच्या केबलचे नुकसान ; ठेकेदारावर गुन्हा दाखल

fir-1

बारामती : महावितरणच्या तांदुळवाडी येथील 11 के.व्ही. उच्चदाब वीज वाहिनीची केबल एअरटेल कंपनीच्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नुकसान झाल्याची घटना घडली असून, याप्रकरणी महावितरणचे सहाय्यक अभियंता महेश  कानतोडे यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

ही घटना 13 जून शेळकेवस्ती, तांदुळवाडी येथे घडली असुन. एअरटेल कंपनीचे फायबर नेटवर्क टाकण्यासाठी निलम एंटरप्रायजेस प्रा. लि. या ठेकेदार कंपनीमार्फत अमर सरडे हे रस्त्यालगत जमिनीतून बोरिंग करत होते. यावेळी तेथून जाणारी महावितरणची 22 के.व्ही. क्षमतेची 300 स्के.एम.एम. आकाराची सुमारे 160 मीटर लांबीची केबल बोअरिंगच्या कामामुळे पूर्णतः खराब झाली. ही केबल तांदुळवाडी परिसरातील शेतीपंपांसाठी अत्यावश्यक होती.

या नुकसानीमुळे महावितरणला एकूण 4,82,595/- इतके नुकसान झाले असून, वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसला. सदर नुकसानीची माहिती देत वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना महावितरणने ठेकेदाराला दिल्या होत्या. मात्र, संबंधित ठेकेदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत टाळाटाळ करीत असल्याने अखेर महावितरणने अधिकृत तक्रार दाखल करत कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारला.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. महावितरणच्या मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संबंधित विभागाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, एअरटेल कंपनीच्या ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित होणं ही गंभीर बाब असून, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अधिक कडक उपाययोजना होणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!