September 26, 2026

अखेर 50 रुपये प्रति दिवस पासिंग विलंब शुल्क केले रद्द

IMG-20240717-WA0188
बारामती : महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्तांनी ऑटो रिक्षा पासिंग विलंब शुल्क 50 रुपये प्रति दिवस घेण्याचे आदेश काढले होते. या आदेशामुळे ऑटो रिक्षा चालकांना मोठा आर्थिक फटका बसणार होता. तो आदेश माघार घ्यावा यासाठी परिवहन आयुक्तांना निवेदन देण्यात आले. परंतु मार्ग निघत नसल्याने राज्यभर आंदोलन झाले. अखेर शासन ब्याक फुटवर गेले आणि जाचक पन्नास रुपये प्रति दिवस पासिंग विलंब शुल्काचा आदेश रद्द करण्यात आला आहे.
या आदेशामुळे राज्यभरातील ऑटो रिक्षा चालक मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑटो चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शशांक राव व महासचिव विलास भालेकर यांच्या नेतृत्वाखाली २४ जूनला राज्यभर आंदोलनाचे अस्त्र उभारले होते. सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी आंदोलनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
अशाप्रकारे बारामतीत देखील बारामती, दौंड, इंदापूर ऑटो रिक्षा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सातव व प्राध्यापक डॉ. भीमराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहरात ऑटो रिक्षा रॅलीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले होते.  या निषेध रॅलीच्या माध्यमातून  येथील परिवहन अधिकारी यांना निवेदन दिले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी निवेदनाचा विचार करून पासिंग विलंब शुल्क 50 रुपये प्रति दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल तमाम रिक्षा चालकात समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. राज्यभरातील ऑटो रिक्षा चालकांच्या एकजुटीने हा न्याय मिळाला असे प्रतिपादन बारामती इंदापूर दौंड कृषी समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सातव यांनी केले.

You may have missed

error: Content is protected !!