February 12, 2026

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

ज्ञानज्योती-सावित्रीबाई-फुले-आधार-योजना
पुणे : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यात येत असून इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात  आले आहे.
महानगरपालिका, विभागीय शहरे, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यासाठी ही योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना भोजन, निवासभत्ता, निर्वाह भत्ता उपलब्ध करुन घेण्यासाठी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी ६० हजार रुपये, इतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरीत क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये ५१ हजार, इतर जिल्ह्याच्या ठिकाणी ४३ हजार व तालुक्याच्या ठिकाणी शिकत असलेल्यांना ३८ हजार रुपये इतकी रक्कम लाभाच्या स्वरुपात वितरीत केली जाणार आहे.
पालकांचे उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या व योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावा. अर्ज महाविद्यालयात देखील उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी इतर मागास बहुजन कल्याण, पुणे कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर, येरवडा, पुणे- ६ येथे संपर्क साधावा, असे आवाहनही सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण संगिता डावखर यांनी केले आहे.
error: Content is protected !!