गुणवडी येथे संत रविदास यांची ६४७ वी जयंती उत्साहात साजरी
बारामती : ग्रामपंचायत गुणवडी याठिकाणी संत शिरोमणी संत रविदास महाराज यांची ६४७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
जयंतीच्या कार्यक्रमात सर्वप्रथम संत रविदासांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी संत रविदासांबद्दल त्यांची मनोगते व्यक्त केली. ॲड. प्रवीण कांबळे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, “मुघल काळात संत रविदास यांचा जन्म झाला होता. त्यांचेवर सुफी संतांचा प्रभाव होता. मुघल राजे बाबर आणि हुमायून यांना संत रविदास यांच्या अध्यात्मिक शक्तीबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संत रविदास यांची भेट घेतली होती. परंतु संत रविदासांनी त्यांना आशीर्वाद देण्यास नकार दिला व सुनावले कि तुम्ही फार मोठी चूक केली आहे कारण बाबर आणि हुमायून यांनी शेकडो लोकांच्या कत्तली केल्या होत्या. परंतु नंतर संत रविदास यांच्या शिकवणीमुळे बाबर आणि हुमायून यांच्यामध्ये बदल झाला आणि त्यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून दिल्ली आणि आग्रा येथील गरीब लोकांना मदत करायला सुरुवात केली.” गुणवडी गावचे पोलीस पाटील यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, “संत रविदासांच्या मृत्यूनंतर संत रविदास आणि त्यांच्या कार्याचे लोकांना विस्मरण झाले होते. इंग्रजांच्या काळात तर लोक रविदासांना पूर्णपणे विसरून केले होते. परंतु ६० च्या दशकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संत रविदास यांच्या स्मृती पुन्हा जागृत केल्या आणि स्वातंत्रोत्तर काळातील भारतातील पहिली संत रविदास जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साजरी केली. संत रविदास यांच्या ४१ पदांचा समावेश शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांनी त्याच्या पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथसाहिबा यामध्ये केला आहे. कारण गुरुनानक यांचेवर संत रविदास यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव होता. संत रविदास यांच्या काळातील अनेक राजा-राणी, राजकुमार-राजकुमारी संत रविदासांचे शिष्य बनले होते.” एलआयसीचे एमडीआरटी (अमेरिका) चे सदस्य महादेव आगवणे यांनी सुद्धा त्यांचे मनोगत व्यक्त केले. गुणवडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व गुणवडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्राचीताई घोडे यांचे पती रवींद्र घोडे यांनी सुद्धा त्यांचे मनोगत व्यक्त करून संत रविदास यांचेबद्दल आदर व्यक्त केला. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य विशाल गावडे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन दीपक आगवणे यांनी केले होते. या कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक केशव आगवणे सर, व्यावसायिक चंद्रकांत आगवणे, सुरेश आगवणे, दीपक आगवणे, अमोल आगवणे, सुनील आगवणे, धनंजय आगवणे, लखन लोंढे, व्यावसायिक रमजानभाई शेख, हर्षद शिंदे, ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक भोलेनाथ खोमणे, ग्रामपंचायत सदस्य संग्राम गावडे आणि अभिजित कांबळे, अमोल दणाणे, विजय गावडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर गुणवडी गावातील चर्मकार समाजाने “चर्मकार समाजासाठी चर्मकार समाजाच्या वस्तीलगत समाजमंदिर बांधणेकरिता जमीन उपलब्ध करून देणेबाबत व तसेच सदर जमिनीत चर्मकार समाजासाठी समाजमंदिर बांधून देणेबाबत” या विषयावर ग्रामपंचायतीला निवेदन दिले.
