मुंबईच्या उपोषणासाठी बारामतीतून दीड हजारांच्या वाहनासह हजारो मराठा बांधव जाणार
बारामती : आझाद मैदान मुंबई येथे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकरिता आमरण उपोषण करणार आहेत, या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी बारामती शहर व तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मराठा बांधव सहभागी होण्यासाठी जाणार असल्याची माहित मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेत दिली.
दि. २६ जानेवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकरिता आमरण उपोषण करणार आहेत. मनोज जरांगे पाटील करीत असलेल्या आमरण उपोषणासाठी त्यांना साथ देण्यासाठी बारामती तालुक्यातील प्रत्येक गावातून वाडी वस्तीवरून दहा ते बारा चार चाकी वाहने व सामानासाठी एक ट्रक किंवा एक टेम्पो अशी प्रत्येक गावाची एक तयारी केली आहे बारामती तालुक्यातून एकूण एक ते दीड हजार चार चाकी वाहने व सामानाचे टेम्पो दि. २४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ०७.०० वा. शिवाजी उद्यान, कसबा, बारामती येथून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोरगावच्या दिशेने निघतील. मोरगावमध्ये मोरगावचे आजूबाजूच्या गावातील समाजबांधव सकाळी ०८.०० वा. एकत्र जमतील व त्यांचेसह संपूर्ण बारामती तालुक्यातील समाज बांधव देहूरोड येथे पोहोचणार आहेत.
आंदोलनासाठी येणाऱ्या बारामती तालुक्यातील सर्व समाज बांधवांच्या जेवणाची सर्व व्यवस्था ही मराठा क्रांती मोर्चा, बारामती यांच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यासोबत आंदोलनासाठी जाणाऱ्या समाज बांधवांसाठी वैद्यकीय प्रथमोपचार साहित्य सोबत घेण्यात आले आहे. आंदोलन हे मनोज जरांगे पाटील यांचे सूचनेप्रमाणे होणार असून ते शांततेच्या मार्गानेच होणार आहे.
बारामती तालुक्यातील जे समाज बांधव आंदोलनासाठी येणार आहेत ते सर्वजण रांगे पाटलांच्या आदेशाशिवाय आंदोलन ठिकाणापासून परत येणार नाहीत. आंदोलनाला निघाल्यापासून परत येईपर्यंत कोणीही कोणत्याही अफवांना बळी पडू नये. जो पर्यंत मनोज जरांगे पाटील स्वतः एखादी गोष्ट स्वतःच्या तोंडाने सांगत नाहीत. तोपर्यंत कोणीही कुठल्याही निष्कर्षाला येवू नये. असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा, बारामती यांच्या वतीने करण्यात आले आहे
