March 28, 2026

१ कोटी १५ लाख भरल्याशिवाय पुनर्जोडणी नाही,….जिल्हा सत्र न्यायालयाचा वीजचोराला दणका,….. ड्रोनच्या सहाय्याने उघडकीस आणली होती वीजचोरी

WhatsApp Image 2023-08-31 at 8.24.23 PM

बारामती :  थकबाकीसाठी बंद केलेल्या मीटरला बायपास करुन उच्चदाबाच्या रोहित्राला थेट केबल जोडून होणाऱ्या वीजचोरीचा महावितरणने ऑगस्ट-२०२३ मध्ये ड्रोनच्या सहाय्याने पर्दाफाश केला होता. केडगाव पोलिसांत महावितरणतर्फे मुकेश अगरवाल यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करत वीजपुरवठा बंद केला. प्रकरण कोर्टात गेल्याने मा. जिल्हा सत्र न्यायालयाने वीजचोरीच्या दंडातील ७५ टक्के म्हणजेच १ कोटी १५ लाख रुपये रक्कम भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत करता येणार नसल्याचा आदेश नुकताच दिला असुन, या आदेशाने वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.

            सणसवाडी (ता. शिरुर) येथे मुकेश ओमप्रकाश अगरवाल (रा. अग्रसेन सोसायटी, कोरेगाव पार्क, पुणे ) यांच्या मालकीच्या तीन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. पैकी मे. थर्मोलाईट पॅकेजिंग इंडिया प्रा.लि व मे. प्रकाश करुगेटेडे पुणे प्रा.लि ह्या दोन उच्चदाबाचे तर मे. भगवान ट्यूब प्रा.लि. हे लघुदाब ग्राहक आहेत. तिन्ही कंपन्या एकाच आवारात व शेजारी-शेजारी आहेत. थकबाकीमुळे एका कंपनीचा कायमस्वरुपी तर दोन कंपन्यांचा वीजपुरवठा तात्पुरता बंद केलेला असताना संबंधित ग्राहकाने मीटरला बायपास करुन थेट रोहित्रातून वीजचोरी केली. महावितरणला याची कुणकुण लागताच २५ ऑगस्ट रोजी ही वीजचोरी महावितरणने मोठ्या शिताफीने उघडकीस आणली. त्यासाठी ड्रोनचीही मदत घेतली.

            तीन पैकी दोन वीज जोडण्यांचा वीजपुरवठा सुरु करुन मिळावा म्हणून ग्राहकाने जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागितली होती. मा. न्यायालयाच्या आदेशानुसार वीजचोरी रकमेच्या ७५ टक्के रक्कम ग्राहकाला भरावयाची आहे. त्याशिवाय वीजपुरवठा जोडून मिळणार नसल्याने वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत. महावितरणतर्फे ॲड.सचिन खंडागळे व ॲड. गणेश डिंबळे यांनी बाजू मांडली.

error: Content is protected !!