बारामतीत कायद्याचा धाक कमी? अतिक्रमण, दमदाटी आणि प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न
बारामती : शहरात कायद्याचा धाक कमी झाला आहे का, असा प्रश्न निर्माण करणाऱ्या सलग दोन घटनांनी बारामतीत मोठी खळबळ उडवली आहे. खाजगी प्लॉटवर जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न आणि दुसरीकडे नगरपालिकेच्या ओपन स्पेसवर अतिक्रमणासाठी दंडेलशाही केल्याच्या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पहिल्या घटनेत, एका वकिलाच्या मालकीच्या खाजगी प्लॉटवर फलटण येथील एका कंपनीत काम करणाऱ्या काही कामगारांनी कथितपणे दहशत निर्माण करत जबरदस्तीने ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. संबंधितांनी धमक्या देत परिसरात तणाव निर्माण केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, बाहेरील घटकांकडून बारामतीत हस्तक्षेप वाढत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
दुसऱ्या घटनेत, बारामती नगरपालिकेच्या मालकीच्या ओपन स्पेसवर अतिक्रमण करण्यासाठी काही जणांनी दंडेलशाहीचा अवलंब केल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या झोपड्यांवर जीसीपी लावून कारवाई करत त्यांना त्रस्त करण्यात आले आणि दबावतंत्र वापरून त्या हटवण्यात आल्याचा आरोप होत आहे. या संपूर्ण प्रक्रियेत पोलीस प्रशासनाचा वापर करून दबाव टाकण्यात आल्याचीही चर्चा असून, सार्वजनिक जागेवर अतिक्रमण होत असताना प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या दोन्ही घटनांमुळे शहरात गुंडगिरी, दहशत आणि अतिक्रमण यांचा सुळसुळाट सुरू असल्याची भावना बळावली आहे. “बारामतीत नेमकं चाललंय तरी काय?” असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नागरिकांनी प्रशासनाने तात्काळ या प्रकरणांची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात अशा प्रकारांना आणखी खतपाणी मिळून शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्रशासनाने वेळीच हा इशारा समजून योग्य ती कारवाई करावी, अन्यथा समाजमाध्यमांच्या माध्यमातून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. “गैरकृत्य करणाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आभास निर्माण झाल्यास, प्रशासनाविरोधात तीव्र भूमिका घेत न्याय मागितला जाईल,” असा इशाराही संतप्त नागरिकांकडून देण्यात येत आहे.
