बारामतीत ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली ६८ लाखांची फसवणूक
बारामती : ऑनलाईन ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून बारामतीतील एका व्यक्तीसह त्याच्या मित्राची तब्बल ६८ लाख १९ हजार ५५० रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित अनोळखी आरोपी अनिश मॅथ्यु याच्याविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसात दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसाद अंबादास बिडकर (वय ५७, रा. तांबेनगर, बारामती) यांच्या दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीकडून फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने ऑनलाईन ट्रेडिंग व्यवसायासाठी ‘mentor’ अनिश मॅथ्यु यांचा व्हॉट्सअॅप क्रमांक देत संपर्क साधण्यास सांगितले.
यानंतर अनिश मॅथ्यु याने ‘compoundes.com’ या वेबसाईटची लिंक पाठवून ऑनलाईन ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. सुरुवातीला विश्वास बसावा म्हणून ५५ USD चा नफा दाखवून ४,९५० रुपये फिर्यादींच्या खात्यावर जमा करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक व्यवहारावर ३० टक्के कमिशन द्यावे लागेल असे सांगण्यात आले.
या आमिषाला बळी पडत फिर्यादी यांनी फोनपे व RTGS द्वारे एकूण ४ लाख ३८ हजार ६०० रुपये विविध खात्यांमध्ये जमा केले. तसेच त्यांच्या मित्रानेही आरोपीने दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये RTGS द्वारे ६३ लाख ८० हजार ९५० रुपये पाठवले. अशा प्रकारे दोघांकडून मिळून ६८ लाख १९ हजार ५५० रुपयांची रक्कम आरोपीने उकळली.
यानंतर पैसे परत (withdrawal) करण्याचा प्रयत्न केला असता, आणखी २६ लाख रुपये भरण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
२४ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२६ या कालावधीत आरोपीने विविध मोबाईल क्रमांकांचा वापर करून स्वतःला ऑनलाईन ट्रेडिंग अकाउंट मॅनेजर व क्रिप्टोकरन्सी तज्ञ असल्याचे भासवून फिर्यादींचा विश्वास संपादन केला आणि ही फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
