June 8, 2026

रेकॉर्डवरील गुन्हेगार थेट नागपूर मध्यवर्ती कारागृहात

IMG-20260308-WA0019

बारामती : बारामती तालुका पोलिसांनी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारावर कठोर कारवाई करत महाराष्ट्र प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत त्याला थेट नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे करूनही सुधारणा न झाल्याने पोलिसांनी ही निर्णायक कारवाई केली असून परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना यामुळे मोठा इशारा मिळाला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तांदुळवाडी (ता. बारामती) येथील सुरेंद्र रवींद्र काजळे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध पुणे ग्रामीण तसेच बारामती परिसरातील विविध पोलीस ठाण्यांत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरोडा, मारहाण, गंभीर दुखापत, विनयभंग तसेच फसवणूक यांसारख्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सदर आरोपी सातत्याने गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी होत असल्याने त्याच्यावर कडक कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, हातभट्टीवाले, धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठीच्या एमपीडीए कायद्याने हा प्रस्ताव पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या मार्फत जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे पाठविण्यात आला होता.

सर्व कागदपत्रांची छाननी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आरोपीस एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. आदेशानुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेऊन नागपूर मध्यवर्ती कारागृहात हलविले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोलीस अंमलदार महेश बनकर, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सागर देशमाने व विकास खाडे यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

 पोलिसांचा गुन्हेगारांना इशारा

“बारामती विभागात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची भूमिका ठाम आणि कठोर आहे. रेकॉर्डवरील तसेच सराईत गुन्हेगारांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून समाजात दहशत निर्माण करणाऱ्यांना कुठलीही सूट दिली जाणार नाही. वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर एमपीडीएसारख्या कठोर कायद्यांखाली थेट कारवाई केली जाईल.”
गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक

“बारामती उपविभागात शांतता आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्या व्यक्तींवर विशेष नजर ठेवून कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल. सामान्य नागरिकांच्या सुरक्षेशी तडजोड होणार नाही.”
सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी

“जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईवर विशेष भर देण्यात येत आहे. २०२५ आणि २०२६ या कालावधीत आतापर्यंत १६ गुंडांना एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले असून ही कारवाई पुढेही सातत्याने सुरू राहणार आहे.”
संदीपसिंग गिल, पोलीस अधीक्षक

You may have missed

error: Content is protected !!