March 6, 2026

बारामतीत वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा; पाच आरोपी अटकेत, चार महिलांची सुटका

IMG_20260306_173657

बारामती : बारामती तालुका पोलिसांनी भिगवण रोडवरील प्रणव लॉज येथे छापा टाकत देहव्यापाराच्या अड्ड्यावर मोठी कारवाई केली. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली असून आसाम व पश्चिम बंगालमधील चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी एकूण सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत यांनी याबाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी सोमनाथ महादेव खोमणे (रा. सावळ, ता. बारामती), धिरज रामभाऊ जाधव (रा. जालना), सागर संजय सोडबुके (रा. बारामती), मेराजुल जानीफ अली (रा. गोलपारा, आसाम), अफजल मझीबर रहमान हुसेन (रा. बरपेटा, आसाम) आणि सदाम जुमरुद्दीन हुसेन (रा. बरपेटा, आसाम) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ५ मार्च रोजी सायंकाळी भिगवण रोडवरील प्रणव लॉज येथे छापा टाकण्यात आला. आरोपी परराज्यातील महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होते. या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांवर ते उपजीविका करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी आसाम येथील तीन महिला (वय ३०, २१ व २६) तसेच पश्चिम बंगाल येथील एक महिला (वय २२) अशा चार महिलांची सुटका केली. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, धनश्री भगत तसेच पोलीस अंमलदार नितीन ढवाण, भारत खारतोडे, दादा दराडे, नीलेश वाकळे, सोनाली सूर्यवंशी, स्मिता गायकवाड, चालक आफरीन शेख व विठ्ठल तरंगे यांनी पार पाडली.

लॉजिंग व्यवसायिकांमध्ये खळबळ

भिगवण रोडवरील प्रणव लॉजवर झालेल्या या कारवाईमुळे शहरातील लॉजिंग व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या या धडक कारवाईची शहरात चर्चा रंगली आहे.

You may have missed

error: Content is protected !!