March 5, 2026

बारामतीत हायवाचा पुन्हा धुमाकूळ; दुचाकी चिरडली, सुदैवाने जीवितहानी टळली

IMG-20260304-WA0237

बारामती : बारामती शहरात भरधाव हायवा वाहनांच्या बेफाम वाहतुकीमुळे अपघातांच्या घटना पुन्हा घडत असून बुधवारी सायंकाळी सातव चौकात पुन्हा एकदा हायवाने दुचाकीला चिरडल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात दुचाकीस्वाराचा जीव वाचला असला तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे शहरातील हायवा वाहतुकीवर नियंत्रण नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सातवचौक परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या हायवा वाहनाने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी हायवाच्या खाली अडकून चिरडली गेली. मात्र दुचाकीस्वार प्रसंगावधान राखत बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी संबंधित हायवा वाहनाची पाहणी केली असता वाहनाच्या पुढील बाजूस एक नंबर प्लेट तर मागील बाजूस वेगळीच नंबर प्लेट असल्याचे दिसून आले. त्यामुळे हे वाहन बेकायदेशीररीत्या रस्त्यावर धावत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बारामती शहर आणि परिसरात बांधकाम साहित्य, वाळू व मुरूम वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. ही वाहने अनेकदा नियम धाब्यावर बसवून वेगाने धावत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात आहेत. मात्र अशा वाहनांवर नियंत्रण ठेवण्यात पोलीस व आरटीओ प्रशासन अपयशी ठरत असल्याची चर्चा शहरात सुरू आहेत.

सातव चौकासारख्या गर्दीच्या चौकात अशा प्रकारचे अपघात घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बेकायदेशीर हायवा वाहतुकीवर तात्काळ कारवाई करून शहरातील वाहतूक सुरक्षित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

अपघात पडद्याआड!

बारामतीत हायवा आणि दुचाकीचा अपघात झाला. क्षणभर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र काही वेळातच दोन्ही पक्षांमध्ये आपापसात सेटलमेंट झाले. दरम्यान, घटनास्थळी आलेल्या वाहतूक पोलिसांनी हायवा चालकावर काय कारवाई केली नाही समजली ?.
यानंतर हायवा चालक आपला मार्गस्थ झाला, दुचाकीस्वारही निघून गेला आणि काही वेळात पोलीसही तेथून निघाले. त्यामुळे अपघाताचा विषय तेवढ्यापुरताच राहिला आणि संपूर्ण प्रकरण अक्षरशः पडद्याआड गेले.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी मात्र, “अपघात झाला, सेटलमेंटही झाली… पण नेमके घडले काय?” असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे हा अपघात आणि त्यानंतरची घडामोड नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
गरज आहे ती अशा घटनांमध्ये पारदर्शकता ठेवण्याची, जेणेकरून अपघातांची खरी कारणे समोर येतील आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करता येतील.

error: Content is protected !!