माळेगाव पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी : ४ लाख ११ हजार रुपयांचे हरविलेले मोबाईल मालकांना परत
बारामती : पुणे ग्रामीण जिल्ह्यातील नागरिकांचे हरविलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत देत माळेगाव पोलीस ठाणे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. एकूण ४ लाख ११ हजार रुपयांच्या किंमतीचे १८ मोबाईल शोधून तक्रार निवारण दिनी संबंधितांना परत करण्यात आले.
पुणे ग्रामीण पोलीस यांचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तसेच अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड व प्रभारी अधिकारी सपोनि. सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय शाखेचे पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे विविध ठिकाणांहून हे मोबाईल हस्तगत केले.
शनिवार दि. २८ फेब्रुवारी रोजी तक्रार निवारण दिनानिमित्त संबंधित १८ नागरिकांना त्यांचे मोबाईल परत देण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत माळेगाव पोलीस ठाण्याच्या कार्याची प्रशंसा केली.
विशेष म्हणजे, माळेगाव पोलीस ठाण्याच्या स्थापनेपासून पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप यांनी आतापर्यंत तब्बल २० लाख २२ हजार रुपये किंमतीचे एकूण १०७ हरविलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत दिले आहेत. त्यामुळे परिसरात पोलिसांबद्दल विश्वास व सकारात्मक भावना निर्माण झाली आहे.
