अनाधिकृत मंदिराची प्राणप्रतिष्ठा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते

बारामती ( भास्कर दामोदरे ) शहरात बेकायदेशीर धार्मिक स्थळांचे उभारणीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, संबंधित प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचे चित्र वारंवार दिसून येते. अलीकडेच शहरात सुरू असलेल्या एका अनधिकृत खाजगी मंदिराच्या बांधकामावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते भास्कर दामोदरे यांनी बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करून संबंधित बांधकाम करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी दामोदरे यांनी केली आहे.
विशेष म्हणजे, या बेकायदेशीर मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय व सामाजिकदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
दामोदरे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, धार्मिक स्थळ उभारणीसाठी गृह विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आवश्यक असते. मात्र, असे कोणतेही प्रमाणपत्र न घेता हे बांधकाम सुरू असून, स्थानिक स्वराज्य संस्थेकडून त्याला अभय दिले जात आहे.
“स्व मालकीच्या जागेचे महत्त्व वाढवण्यासाठी अशा प्रकारे बेकायदेशीर मंदिरांची उभारणी करून त्यांना राजकीय वरदहस्त मिळवून देणे हा प्रकार बारामतीत सर्रास सुरू आहे, ” असा आरोप त्यांनी केला आहे. दुसरीकडे, राज्याचे मुख्यमंत्री अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश प्रशासनाला देत असतानाही बारामतीतील नगरपालिका मात्र अशा बांधकामांना मूकसंमती देत असल्याचे दिसते.
शहरात धार्मिक स्थळांच्या नावाखाली नियमबाह्य बांधकामांना पाठीशी घालणे आणि त्याला राजकीय समर्थन मिळणे, ही गोष्ट गंभीर असून प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटते. नागरिकांकडून या प्रकाराला विरोध होऊ लागला असून, कायद्याचा सर्वांसाठी एकच निकष असावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आणि जर हे काम नियमाने आहे नगरपालिकेने नुकत्याच केलेल्या पथारी आणि फुटपाथ वर रोजी रोटी कमाविणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचा पाश का ? ही नगरपालिकेची दुटप्पी भुमिका नाही का ? अशी बारामतीच्या चौका-चौकात सुरु आहे.