आर्थिक फायद्याकरीता अभियांत्रिकी परीक्षेत गैरप्रकार करणारी टोळी जेरबंद

बारामती : आर्थिक फायद्यासाठी अभियांत्रिकी परीक्षेमध्ये गैरप्रकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पुणे गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने चौघांना अटक केली आहे. परीक्षेतील उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन परत लिहून घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
दिनांक २ जून रोजी युनिट ६ चे सहाय्यक पोलिस निरीक्षक मदन कांबळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पार्वतीबाई गेणबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वाघोली, पुणे येथील मेकॅनिकल विभागाचे प्राध्यापक प्रतिक सातव हे ‘इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स या विषयाच्या उत्तरपत्रिका पुन्हा विद्यार्थ्यांकडून लिहवून घेणार असल्याचे समजले. त्यानुसार ३ जून रोजी युनिट ६ च्या पथकाने कॉलेजवर छापा टाकला असता, प्राध्यापक प्रतिक सातव यांच्यासह ३ विद्यार्थी अटक करण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये खालील आरोपींचा समावेश आहे प्रतिक किसन सातव (वय ३७, रा. केसनंद, वाघोली, पुणे), आदित्य यशवंत खिलारे (वय २०, रा. वाघोली, पुणे), अमोल आशोक नागरगोजे (वय १९, रा. वाघोली, पुणे) अनिकेत शिवाजी रोडे (वय २०, रा. वाघोली, पुणे) अशी आहेत.
सदर पार्वतीबाई गेणबा मोझे कॉलेजमध्ये शिकणारे प्रथम वर्षाचे एकूण ८ विद्यार्थीही आढळून आले. पोलिसांनी तपासणीदरम्यान ६ उत्तरपत्रिकांचे बंडल, २,०६,००० रुपये रोख रक्कम आणि परिक्षा कंट्रोल रूमची बनावट चावी जप्त केली.
प्राथमिक चौकशीतून समोर आले की, विद्यार्थ्यांना विषयात नापास होण्याची भीती दाखवून १० ते ५० हजार रुपये घेऊन उत्तरपत्रिका पुन्हा लिहून देण्याचे काम हे आरोपी करत होते. परिक्षा कंट्रोल रूमची बनावट चावी वापरून उत्तरपत्रिका चोरून त्या विद्यार्थ्यांकडे दिल्या जात होत्या. या प्रकारामुळे शासनाची फसवणूक झाली आहे.
या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे १) गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे आणि त्यांच्या पथकाने केली.