राज्य सरकार कसे हातात घेता येईल ते मी बघतो….शरद पवार
बारामती : केंद्र सरकारचा पर्यावरणाचा एक कायदा आहे. त्या कायद्यानुसार पाणी अस्वच्छ करण्याची स्थिती असेल तर त्या बाबतीत स्वच्छ कारवाई करण्याचा अधिकार केंद्र आणि राज्य सरकारला आहे. नीरा नदीचे पाणी इतकं खराब आहे की त्या पाण्यात हात सुद्धा घालता येत नाही. हे पाणी कसं नीट करून घेता येईल, याचा आग्रह आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे करणार आहोत. दोन्ही सरकार आमच्या हातात नाहीत. सरकार जरी आज नाही पण उद्या निवडणुका येतील कालच्या निवडणुकीला काम जसं झालं तसं काम जर आता झालं तर राज्य सरकार कसे हातात घेता येईल ते मी बघतो. राज्य सरकार हातामध्ये आलं तर ही पोकळी दुरुस्त करायला वेळ लागणार नाही असे वक्तव्य जेष्ट नेते शरद पवार यांनी बारामती तालुक्यातील निरावागज गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले.
पुढे पवार म्हाणाले की, स्थानिक नेत्यांनी काही केलं नाही पण तुम्ही लोकांनी लक्ष दिलं तर तुमच्या पाठीशी शक्ती उभी करणे, तुम्हाला सहकार्य करणे या गोष्टीत लक्ष दिले जाईल, तसेच लोकसभेच्या निवडणुकीला जे करायचं ते तुम्ही केलं. आता विधानसभेची निवडणूक आली तिथेही योग्य आहे ते करा आणि उद्या हे सगळे प्रश्न आहेत मग ते या तालुक्यातले असतील, काही इंदापूर तालुक्यातले असतील, हे जे पाणी खराब आहे, निऱ्यापासून ते खालपर्यंत सगळीकडे याचा त्रास आहे आणि यासंबंधीचे निकाल राज्य सरकारला घ्यावे लागतील, ते काम आपण वेळोवेळी या ठिकाणी करू.
एकेकाळी माझं इथे येणं जास्त असायचं. आमचे काही सहकारी होते त्यांची शेती इथे नव्हती. काही लोकांच्या मी घरी जायचं मोहम्मद भाई म्हणून आमचे सहकारी होते. संभाजी होते अनेक लोक या ठिकाणी जिवाभावाचे होते आणि वर्षानुवर्ष त्यांनी साथ दिली मला आणि सुप्रियाला दिली. आपण एकत्र राहू या लोकांची कामे कसे होतील त्यासाठी प्रयत्न करूया. पाणी जसं शुद्ध करायचा विचार करावा लागेल तशी जमीन सुद्धा नीट करायचा विचार सरकारला करायला भाग पाडावा लागेल आणि ते काम तुम्ही आम्ही सगळे मिळून करायला लावू असेही पवार यांनी व्यक्त केले.
निरा वागज येथील अनेकांची साथ तालुक्याच्या राजकारणामध्ये आम्हा लोकांना मिळाली. माळेगाव साखर कारखाना सुद्धा तुमच्या गावासाठी महत्त्वाचा आहे. या गावातून अनेकांना मोठा करण्याच्या साठी प्रयत्न केला. त्यांना मोठमोठ्या जागा दिल्या. अपेक्षा ही आहे सरकार येतं आणि सरकार जाते सुद्धा. ज्या माणसांनी आपल्याला शक्ती दिली त्या लोकांच्या जीवनात बदल करण्यासाठी सरकारं वापरली तर लोक त्याची आठवण ठेवतात. तो विचार न करता गावातल्या ज्यांनी पाठिंबा दिला त्यांना या भागातल्या लोकांच्या संसारावर काही ना काहीतरी बदल करणे ही जबाबदारी ज्यांच्या हातात सत्ता येते त्यांची असते. कोणी आपलंच भलं करण्याचं ठरवलं तर त्यात ते तात्पुरते यशस्वी होतात पण लोक ते विसरत नसतात. मी नेहमी सांगतो या देशात लोकशाहीचे राज्य आहे. मतदान करायला लोक जातात आणि त्यांच्या मनाला जे वाटतं ते बटण दाबतात. काही लोक निवडून येतात किंवा पराभूत होतात. या देशाची लोकशाही टिकली तर तुमच्यासारख्या कोट्यावधी लोकांनी शहाणपणाने मताचा अधिकार बजावला. आता याच निवडणुकीमध्ये गावचे नेते होते त्यांना मत दिली ते कुठे आसपास दिसत नाहीत. काही ठिकाणी तर दमदाटी केली तरी लोकांनी काय केलं? जगताप ज्या संघटनेचे अध्यक्ष आहेत, सातव बारामतीचे माजी नगराध्यक्ष आहेत, नवले हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. ही मंडळी निवडणुकीसाठी गावात यायची आणि कोणी त्यांना भेटायला तयार नव्हतं. पण मतदान ज्या दिवशी झालं मतमोजणी झाली तेव्हा कळलं की गाव मोठ्यांच्या हातात नाही. गावातल्या लोकांनी मोठ्यांची किंमत केली आणि जनतेच्या मागण्यांची किंमत मोठ्या नेत्यांनी केली नाही तर त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम न डगमगता विशेषतः सामान्य लोक, तरुण पिढी यांनी करून दाखवली.
तुम्ही तुमचं काम केलं ते काम कराल ते सांगायला मी आलो नव्हतो पण तुम्हाला माहीत होतं काय करायचं ? आता आम्हा लोकांची जबाबदारी आहे. निरावागजचे काही प्रश्न आहेत. नदीचे पाणी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. एकेकाळी या नदीमध्ये मी बंधारे बांधले त्याचा सुरुवातीला फायदा झाला. सोमेश्वर कारखाना, माळेगाव कारखाना ही कारखानदारी आपल्या हिताची आहे पण नदीचे पाणी खराब करण्यामध्ये यांचा मोठा वाटा आहे, त्यासाठी काही ना काही तरी करावे लागेल असेही बोलताना पवारांनी व्यक्त केले.
