October 24, 2025

बारामती परिमंडलात ५ वर्षांत ५ लाख विक्रमी वीज जोडण्या

IMG_2020

बारामती : एप्रिल २०१९ ते डिसेंबर २०२३ या जवळपास पाच वर्षांच्या कालावधीमध्ये महावितरण बारामती परिमंडलाने तब्बल ५ लाख २ हजार ९१६ इतक्या विक्रमी वीज जोडण्या देण्याचे काम केले आहे. यात कृषीच्या १ लाख ९ हजार ७२ वीजजोडण्यांचा समावेश आहे. परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक दिवस, एक गाव’, ‘मागेल त्याला कनेक्शन’ अशा विविध मोहिमा वेळोवेळी व यशस्वीपणे राबविल्याने हे उत्तुंग यश साध्य झाले आहे. परिणामी महावितरणच्या महसूलात घसघशीत वाढ झाली आहे.

बारामती परिमंडलात पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, शिरुर, पुरंदर व भोर तालुके तर सातारा व सोलापूर हे जिल्हे येतात. सुनिल पावडे यांनी परिमंडलाचा पदभार घेतल्यापासूनच ग्राहकाभिमुख सेवेला महत्व दिले. ग्राहकाला वेळेत वीज जोडणी दिली, त्याचे बिलींग अचूक केले तर ग्राहक पैसे भरण्यास मागेपुढे पाहत नाही हा विश्वास त्यांना होता. त्यामुळे पावडे यांनी योग्य नियोजन केले. गावागावात कॅम्प लावून वीज जोडण्या दिल्या. ३१ मार्च २०१९ अखेरीस परिमंडलाची ग्राहक संख्या सुमारे २४ लाख ८९ हजार ९४२ इतकी होती. डिसेंबर २०२३ अखेरीस ग्राहक संख्येत २० टक्के वाढ झाली, हे विशेष.

आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये ९९ हजार ४३३, २०२०-२१ मध्ये ७१ हजार ६०१, २०२१-२२ मध्ये १ लाख १३ हजार ५३७, वर्ष २०२२-२३ मध्ये १ लाख २५ हजार ९५२ तर चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये डिसेंबर अखेर ९२ हजार ३९३ अशा एकूण ५ लाख २ हजार ९१६ वीज जोडण्या देण्याचे काम झाले आहे. यामध्ये कृषीच्या १ लाख ९ हजार ७२ तर बिगरशेतीच्या ३ लाख ९३ हजार ८४४ वीजजोडण्यांचा समावेश आहे.

 ३० मीटर अंतरातील कृषी जोडणी तत्काळ

ज्या शेतकऱ्यांच्या विहीरीचे किंवा बोअरवेलचे अंतर महावितरणच्या अस्तित्वात असलेल्या वीज यंत्रणेपासून ३० मीटरच्या आत आहे, त्यांना २४ तासात कनेक्शन देण्याचे काम सुरु आहे. या अंतरातील प्रलंबित वीज जोडण्यांची संख्या शून्यावर आहे. नव्याने ज्यांना ३० मीटरच्या आतील जोडणी हवी असेल त्या शेतकऱ्यांनी स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज करावा. ३० मीटर ते २०० मीटर अंतरावर जोडणी देण्याचे कामही निधीनुसार केले जात आहे.

सोमेश्वर उपविभागाची नेत्रदिपक कामगिरी

बारामती तालुक्यातील सोमेश्वर उपविभागाची वाटचाल दोन पावले पुढे आहे. उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता संतोष चव्हाण यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात ‘गतिमान वीज जोडणी अभियान’ राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष घरांची संख्या व तिथे वीज जोडणी आहे का याची खात्री केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तब्बल ५ हजारांहून अधिक जोडण्या तपासल्या. १२०० अनधिकृत आकडे काढून त्यांना वीजजोडणी घेण्यास प्रवृत्त केले. २८८ शेतीपंपाची प्रत्यक्ष अश्वशक्तीनुसार नोंद केली. ज्यामुळे वाढीव भार १६१० तर नवीन कनेक्शनमुळे ४००० असा ५६१० अश्वशक्तीचा भार अधिकृतपणे यंत्रणेत आला. सर्व्हेक्षणामुळे १३६८ घरगुती कनेक्शन वाढले. त्यांचे हे अभियान अजून थांबलेले नाही. प्रत्येक घरापर्यंत पोहोचून ते कनेक्शन वाढविण्याचे काम करत आहेत.

You may have missed

error: Content is protected !!