मतदानाच्या आदल्या रात्री बारामतीत ‘पैशांचा पाऊस?
बारामती :बारामती शहरात मतदानाच्या आदल्या रात्री ‘ रात्रीत खेळ चाले’ अशीच परिस्थिती निर्माण झाली असून गल्लोगल्लीत पैशांचा पाऊस पडत असल्याचे उघड चित्र समोर येत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी खुलेआम रोख रक्कम वाटप सुरू असल्याच्या तक्रारी असूनही प्रशासन मात्र मूक गिळून गप्प असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
शहरातील विविध भागांत रात्रीच्या अंधारात संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी घरोघरी जाऊन तर काही ठिकाणी ठरावीक ठिकाणी बोलावून मतदारांना दोन ते अडीच हजार रुपयांची ‘बोली’ लावली जात असल्याची चर्चा उघडपणे सुरू आहे. लोकशाहीचा कणा असणारा मतदारच जर अशा प्रकारे विक्रीला निघाला असेल, तर लोकशाहीचे भवितव्य काय, असा सवाल सुज्ञ नागरिक उपस्थित करत आहेत.
या प्रकाराबाबत प्रशासन मूग गिळून बसल्याने ठोस कारवाई होत नसल्याची संतापजनक बाब समोर येत आहे. तक्रारीनंतर काही ठिकाणी केवळ औपचारिक भेटी दिल्या जात असून प्रत्यक्षात पैशांचे वाटप थांबलेले नाही, असा आरोप आहे. निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा सर्रास भंग होत असताना संबंधित यंत्रणा डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, पैशाच्या जोरावर मते विकत घेण्याचा हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून यामुळे प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय होत आहे. प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने तातडीने ठोस पावले उचलून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील जागरूक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
निवडणूक म्हणजे उत्सव असावा, पैशांचा बाजार नव्हे. मात्र सध्या बारामतीत लोकशाहीचा बाजार भरल्याचे चित्र दिसत असून यावर वेळीच लगाम घातला नाही, तर लोकशाहीची मूल्येच पायदळी तुडवली जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
