बारामतीत महिलेवर दहशत; दोघांकडून शस्त्र दाखवत दागिने केले लंपास
बारामती : बारामती तालुक्यातील वंजारवाडी परिसरातील पालखी महामार्गावर स्कुटीवरून जात असलेल्या महिलेचा पाठलाग करत मोटारसायकलवरील दोन इसमांनी महिलेची स्कुटी आडवीत, तिची चावी हिसकावून घेतल्याची धक्कादायक घटना घडली. यावेळी आरोपींनी हातातील धारदार शस्त्रांचा धाक दाखवत पीडितेला जिवे मारण्याची धमकी दिली आणि जबरदस्तीने हातातील सोन्याच्या बांगड्या व अंगठी काढून घेतली. या प्रकारात साधारण ₹३ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींनी लंपास केल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी मोटारसायकलवरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून आरोपींचा तपास वेगाने सुरू करण्यात आला आहे. फिर्यादीने दिलेल्या वर्णनानुसार आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलिसांचे सुरू आहेत.
याच भागात मागच्या वर्षी देखील काही अज्ञात आरोपींनी एका महिलेचा व्हिडीओ चित्रण काढून तिला लुटले होते त्या गुन्ह्याचे काय झाले याचे उत्तर देखील अद्याप अनुत्तर असतानाच पुन्हा महिलेला शास्त्राचा धाक दाखवून लुटले असल्याने आणि पुन्हा अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
