शाश्वत नोकरी, प्रतिष्ठा व पैसा याकडे तरुणाईचं लक्ष… – आ. सत्यजीत तांबेंनी करिअर संसदेच्या माध्यमातून तरुणाईला केले मार्गदर्शन
बारामती : सरकारी नोकरी मिळवण्याच्या मागे आज मोठ्या संख्येने तरुण पिढी प्रयत्न करत आहे. मात्र, सरकारी नोकरीच्या मागे न लागता खासगी नोकऱ्या व उद्योजकता याकडे देखील करिअर संधी म्हणून मुलांनी पहिलं पाहिजे, असे मत आमदार सत्यजीत तांबे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, शारदाबाई पवार महिला आर्टस्, कॉमर्स अँण्ड सायन्स महाविद्यालय, शारदानगर, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ‘करिअर कट्टा’ या उपक्रमांतर्गत करिअर संसद राज्यस्तरीय दोन दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. बारामती येथील शारदानगरमध्ये करिअर संसद अधिवेशन पार पडले. यावेळी ते बोलत होते.
सत्यजीत तांबे म्हणाले की, तरुणांनी फक्त सरकारी नोकरीच्या मागे न लागता खासगी क्षेत्रात देखील प्रयत्न केले पाहिजेत. जेणेकरून सरकारी क्षेत्रात अडचणी निर्माण होणार नाहीत. तरुणाई आज शाश्वत नोकरी, प्रतिष्ठा आणि पैसा या गोष्टींच्या मागे जास्त लागतात. या संधी खासगी क्षेत्रात देखील उपलब्ध आहेत. तसेच मुलांना शालेय जीवनापासून आपण भविष्यात काय करायला पाहिजे, याचे धडे दिले पाहिजे. याबाबत कुठलीही यंत्रणा कार्यरत नाही. म्हणून मुलं इंटरनेटच्या माध्यमातून संशोधन करून आपलं करिअर निवडतात. त्यामुळे त्यांना भविष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी शालेय जीवनापासूनच त्यांच्यासाठी करिअर मार्गदर्शनाबाबत माहिती देणे आवश्यक आहे.
दरम्यान, तरुण विद्यार्थ्यांना विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच करिअर संसदेचा पहिला दिवस उत्साहात पार पडला. याप्रसंगी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य नितीन घोरपडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य देवीदास वायदंडे, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र अध्यक्ष यशवंत शितोळे, अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार ,शारदाबाई पवार महिला आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय प्राचार्य प्रा. एस. व्ही, महामुनी, डी. डी. पाटील, व पुनम पवार आदींची उपस्थिती होती.
